सहाय्यक फौजदारानेच केली तीन लाखांची फसवणूक; ज्या ठाण्यात कार्यरत, तिथेच गुन्हा दाखल

छावणी पोलीस ठाण्यात मोहरील पदावर कार्यरत असताना सहाय्यक फौजदार रामदास संतराम गायकवाड (वय ५५) यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय बँक खात्यातील ३ लाख ४ हजार ८१९ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

    छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलीस ठाण्यात मोहरील पदावर कार्यरत असताना सहाय्यक फौजदार रामदास संतराम गायकवाड (वय ५५) यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय बँक खात्यातील ३ लाख ४ हजार ८१९ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. छावणी पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले गायकवाड हे गेल्या वर्षभरापासून पालकमंत्र्यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहेत.

    छावणीतील एसबीआय बँकेत पोलीस निरीक्षकांच्या नावाने शासकीय खाते आहे. डॉ. होळकर यांनी ८ फेब्रुवारी रोजी प्रभारी निरीक्षकपदाचा चार्ज घेतला. त्यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व कामांची माहिती घेत असताना, त्यांनी या खात्याची माहिती घेतली. या खात्यात शासनाकडून पोलीस ठाण्याला मिळणारा निधी, पोलीस अधिकारी व अंमलदारांना मिळणारे भत्ते व इतर शासकीय रक्कम जमा होते. या खात्यावरील रक्कम चेकद्वारे काढण्यात येते, अशी माहिती विद्यमाने मोहरील सहाय्यक फौजदार सातपुते यांच्याकडून होळकर यांना मिळाली. त्यांनी कॅशबुकची तपासणी केली असता, जमा-खर्चामध्ये तफावत दिसून आल्याने, तत्कालीन मोहरील रामदास गायकवाड यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू असल्याचे त्यांना समजले.

    डॉ. होळकर यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता, ३० एप्रिल २०२१ रोजी चेकद्वारे खात्यातून ३ लाख ४ हजार ८१९ रुपये काढण्यात आले. मात्र, त्याची नोंद पोलीस ठाण्यातील कॅशबुकमध्ये नसल्याचे दिसून आले. तसेच जमा-खर्चाच्या व्हॉऊचरमध्ये ओव्हर रायटिंग केल्याचे दिसून आले. त्यावरून गायकवाड यांनी शासकीय रकमेचा अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने, छावणी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ज्या ठाण्यात कार्यरत, तिथेच गुन्हा दाखल

    गायकवाड यांनी ३० एप्रिल २०२१ रोजी एसबीआयच्या शासकीय बँक खात्यातून ३ लाख ४ हजार ८१९ रुपये काढले आहेत. मात्र, त्याचा हिशोब काही दिलेला नाही. त्यामुळे निरीक्षक डॉ. होळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे गायाकवाड यांची नेमणूक ज्या पोलीस ठाण्यात आहे. त्याच ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक देवकते हे करत आहेत.