पन्हाळा गडावरील धोकादायक ध्वज स्तंभ बदलण्यासाठी पुरातत्व विभागाच ठरतोय अडसर

ऐतिहासिक पन्हाळा गडावरील ध्वज स्तंभ धोकादायक झाल्याने ध्वज स्तंभ सज्जाकोठी इमारती समोरच्या जागेवर उभा करण्यासाठी पुरातत्व खात्याने त्याला मंजुरी दिली पण, आता पुरातत्व विभागाकडून या कामाला तांत्रिक अडचणी दाखवत अडसर निर्माण करत असल्याचा आरोप केला जातोय.

    पन्हाळा: ऐतिहासिक पन्हाळा गडावर (Panhala Fort) 15 ऑगष्ट, 26 जानेवारी, व 1 मे रोजी सज्जाकोठी येथे शासकीय ध्वजारोहण केले जाते. येथील ध्वज स्तंभ धोकादायक झाल्याने ध्वज स्तंभ सज्जाकोठी इमारती समोरच्या जागेवर उभा करण्यासाठी पुरातत्व खात्याने त्याला मंजुरी दिली पण, आता पुरातत्व विभागाकडून (Archeology Department) या कामाला तांत्रिक अडचणी दाखवत अडसर निर्माण करत असल्याचा आरोप केला जात आहे. ध्वज स्तंभ (flag column) तातडीने उभा करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले (Chetan Bhosale) यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी (Collector Office) यांना निवेदन देत न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

    जाज्वल इतिहास असलेला पन्हाळा किल्ला हा ऐतिहासिक असल्याने येथील शासकीय मुख्य ध्वजारोहण सज्जाकोठी येथेच होते. सध्या ध्वजारोहण करत असलेले ठिकाण सज्जाकोठी ईमारतीच्या उत्तर बाजूच्या भिंतीवर खूप उंचीवर आहे. मात्र इमारत ऐतिहासिक व पुरातन असल्याने जीर्ण झालेली आहे. त्यामुळे ध्वजारोहण करताना अनेक अडचणी येतात. ध्वजारोहण करण्याबाबत पुरातत्व कार्यालयाकडे जागा निश्चितीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालया मार्फत करण्यात आलेला होता. कामाची शासकीय मंजूरी असताना ध्वज स्तंभ उभा करण्याचे काम पुरातत्व विभागच करणार या कारणास्तव पुरातत्व विभागाने सुरु केलेले काम थांबवलेले आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

    याबाबत विभागीय पुरातत्व अधिकारी विजय चव्हाण यांनी अधिकची माहिती दिली आहे. विजय चव्हाण म्हणाले, ध्वज स्तंभ पन्नास फुट उंचीचा होणार असून त्याची आँनलाईन निविदा दिल्ली पुरातत्व कार्यालयाकडून काढण्यात आली होती. काही तांत्रिक कारणामुळे ती रद्द झाल्याने आता नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र यासाठी काही अवधी जाणार असला तरीही लवकरात लवकर ध्वज स्तंभ उभा केला जाणार आहे. पुरातत्व विभाग ध्वज स्तंभ उभा करण्यास कोणताही अडसर निर्माण करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.