नगराध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, कचऱ्याच्या दुर्गंधीवरून नगराध्यक्षांना धरले धारेवर!

नगराध्यक्षांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

  देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या आवारामध्ये डंपिंग केलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरल्याने संतप्त भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नगराध्यक्षांच्या दालनात धडक देत नगराध्यक्षा श्रीमती साक्षी प्रभू यांना धारेवर धरले. नगराध्यक्षांकडून समर्पक उत्तर न मिळाल्याने मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दोन दिवसांत कचरा उचलण्यात येईल असे आश्वासन दिले.

  यावेळी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, माजी आमदार अजित गोगटे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, माजी नगराध्यक्ष ऍड. प्रणाली माने, दयानंद पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, नगरसेविका सौ.तन्वी चांदोस्कर, सौ.ऋचाली पाटकर, सौ. स्वरा कावले, सौ. मनीषा जामसंडेकर, माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, संजय तारकर आदी उपस्थित होते.

  नगर पंचायतीने गेल्या महिन्याभरापासून नगरपंचायतीच्या आवारात ओला आणि सुका कचरा डम्पिंग करण्याचे काम सुरू केले आहे. या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात मास्क लावून राहावे लागते. नगरपंचायत आवारात असलेल्या जास्त दराच्या धान्य दुकानांवर देखील याचा परिणाम झाला आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नगरपंचायत सत्ताधाऱ्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. नगरपंचायतीने तातडीने हा कचरा उचलावा अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावी भाजप कार्यकर्त्यांनी दिला.

  हा कचरा किती दिवसात हलविणार याबाबत लेखी माहिती द्या अशी मागणी भाजपाने केली. मात्र नगराध्यक्षांनी लेखी माहिती देण्यास नकार दिला. अखेर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दोन दिवसात कचरा हलवण्याचे आश्वासन दिले. भाजपाने दोन दिवसात कचरा न हलवल्यास पुढे आंदोलन सुरू ठेवू, असा इशारा दिला.

  देवगड जामसाने नगरपंचायतीच्या वतीने शहरातील संकलित होणारा कचरा सुरुवातीला दाभोळ येथे डम्पिंग केला जात होता. त्यासाठी दाभोळे ग्रामपंचायतने देखील परवानगी दिली होती. मात्र भाजपने तेथील ग्रामस्थांना भडकवून कचरा डम्पिंग करण्यास विरोध करायला भाग पाडले. त्यानंतर त्या ठिकाणी डम्पिंग होऊ शकले नाही, ज्या ठिकाणी कचरा डंपिंग केला जात होता. त्या त्या ठिकाणी भाजपने त्रास दिला त्यामुळे कचरा टाकण्यासाठी कोणी जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे हा कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे, तात्पुरत्या स्वरूपात मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या आवारात कचरा संकलित करण्याचा निर्णय घेतला. मात्र लवकरच हा कचरा उचलून अन्यत्र त्याची विल्हेवाट लावली जाईल असे नगराध्यक्ष श्रीमती प्रभू यांनी सांगितले.

  नगरपंचायत प्रशासनावर आमदार नितेश राणे यांचा दबाव आहे. आमदार राणे हे सत्तेत असल्यामुळे नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षांचे काही ऐकायचे नाही असे सांगितल्यामुळे प्रशासन आपले काही ऐकत नाही. आपण राजीनामा द्यावा यासाठी आमदार आणि भाजपकडून हे प्रकार केले जात असल्याचा आरोप नगराध्यक्षांनी यावेळी केला.

  नगराध्यक्ष प्रभू म्हणाल्या, नगर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती म्हणून प्रचार केला, मात्र नगरपंचायतीमध्ये युतीधर्म पाळत नाहीत. नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्याच नगराध्यक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना त्याची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.