घरबसल्या पैसे कमाविण्याच्या आमिषाने लष्करातील लिपिकाला गंडा; तब्बल 5.20 लाखांची फसवणूक

घरबसल्या पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminals) लष्करातील लिपिकाची 5 लाख 20 हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी विनितकुमार सुरेश चंद्र (वय 28, रा. येरखेडा, कामठी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    नागपूर : घरबसल्या पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminals) लष्करातील लिपिकाची 5 लाख 20 हजार रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी विनितकुमार सुरेश चंद्र (वय 28, रा. येरखेडा, कामठी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    विनितकुमार हे दिल्ली येथे लष्कराच्या कार्यालयात लिपिक आहेत. अलीकडेच ते सुट्यांवर घरी आले होते. 17 जुलैला सकाळच्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईलवर संदेश आला. घरबसल्या पार्टटाईम जॉब असल्याचे संदेशात लिहिले होते. विनीतकुमार यांनी संदेश वाचून कामासंदर्भात अधिक विचारणा केली असता टूरिस्ट कंपनीला योग्य किमतीत उत्तम दर्जाचे रेस्टॉरंट सांगायचे असल्याचे छोटेसे काम असल्याने विनीतकुमार यांनी होकार दिला आणि कामाला सुरुवात केली. कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांना 8 हजार रुपयांचा मोबदला सायबर गुन्हेगाराने दिला. त्यामुळे त्यांचा विश्वास पक्का झाला. त्यानंतर आरोपीने नियमित काम करण्यासाठी काही रक्कम गुंतवावी लागेल, असे सांगितले.

    आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने रक्कम गुंतवली आणि कामाला सुरुवात केली. यावेळी फिर्यादीला मोबदला मिळायचा परंतु ऑनलाईन रक्कम काढण्यासाठी पुन्हा रकमेची मागणी व्हायची. असे करता करता विनितकुमारने 5 लाख 20 हजार रुपये गुंतविले. मात्र, परतावा काही मिळाला नाही. तसेच आरोपीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. फोन बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे विनितकुमारच्या लक्षात आले.