कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांची छेड काढणारा अटकेत

डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त येते. ही महिला प्रवासी लोकलमध्ये चढत असताना एका व्यक्तीने तिला धक्का दिला.

    कल्याण : महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या एका व्यक्तिला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नव आहे. तो कसारा येथे राहतो.

    कल्याण रेल्वे स्थानकात गर्दी असते. या स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये जा करतात. डोंबिवलीत राहणारी प्रवासी महिला डोंबिवलीहून कल्याणला कामानिमित्त येते. ही महिला प्रवासी लोकलमध्ये चढत असताना एका व्यक्तीने तिला धक्का दिला. महिलेला वाटले की, चूक झाली असेल. मात्र महिला धक्का लागून स्वत:ला सावरत फलाटावर उभी होती. नंतर ही महिला तीन नंबरच्या फलाटावरुन सात नंबरच्या फलाटावर गेली. त्या फलाटावरही तोच व्यक्ती तिचा पाठलाग करीत आला. तिने पुन्हा तिच्यासोबत तोच प्रकार केला. प्रवाशांच्या मदतीने फलाटावर असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला पकडले.

    रोहित वरकुटे असे या व्यक्तीचे नाव असून तो कसारा येथे राहतो. कल्याण जीआरपी पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहितला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता रोहितला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रोहितने असा प्रकार अन्य महिला सोबत केला आहे का याचा तपास कल्याण जीआरपी पोलीस करीत आहेत.