इझी पे कंपनीला गंडा घालणारे अटकेत, पश्चिम बंगालमधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार्‍या "इझी" पे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्यांच्याचकडे काम करणार्‍या तब्बल ६५ एजंटांनी संगणमताने तांत्रिक सुविधांचा गैरवापर करून साडेतीन कोटींचा आर्थिक गंडा घातल्याला प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन आरोपींना कोलकत्ता येथून अटक केली.

    पुणे : ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार्‍या “इझी” पे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला त्यांच्याचकडे काम करणार्‍या तब्बल ६५ एजंटांनी संगणमताने तांत्रिक सुविधांचा गैरवापर करून साडेतीन कोटींचा आर्थिक गंडा घातल्याला प्रकार समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन आरोपींना कोलकत्ता येथून अटक केली. गुन्ह्यात यापुर्वी दोघांना अटक केली आहे.

    उबेद उर्फ उब्बेदुल्ला अन्सारी (३६, रा. गया, बिहार), आयुब बाशिर आलम (२०, रा. गया, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, यापुर्वी या गुन्ह्यात अंकितकुमार अशोक पांडे (वय.२०,रा.नवादा, बिहार), छोटू उर्फ एजाज आलम यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हे शाखेचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे, अर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिनल सुपे-पाटील, उपनिरीक्षक तुषार भोसले, अंमलदार नवनाथ जाधव, निलेश लांडगे, संदेश कर्णे आदींसह पथकाने ही कामगिरी केली.

    पोलिसांनी आता व यापुर्वी अटक केलेले सर्व आरोपी बिहार येथील रहीवासी आहेत. ते पश्चिम बंगालमध्ये वास्तव्यास होते. इझी पे चे पुण्यातील कार्यलय येरवडा परिसरात आहे. कंपनी देशभरात ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देते. यासाठी कंपनीने नोंदनीकृत एजंटची नेमणूक केलेली आहे. ११ ऑगस्ट २०२२ पासून कंपनीच्या ६५ एजंटनी कंपनीच्या वेब पार्टल अ‍ॅपद्वारे अधिकृत यंत्रणेत कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अधिकृत दिलेले मोबाईल सोडून इतर मोबाईलचा वापर केला. त्याद्वारे कंपनीच्या व्हीपीए खात्यातून इतर ४४ बँक खात्यावर एजंटचे कमिशन सोडून ३ कोटी ५२ लाख ७० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

    कंपनीच्या खात्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे गेल्याचे समोर आले. तेव्हा माहिती घेतली असता एजंट म्हणून काम करणाऱ्यांनीच फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानुसार कंपनी व्यवस्थापनाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपासात तांत्रिक विश्लेषनाद्वारे संशयित एजंट पांडे याला पोलिसांनी पकडले. तेव्हापासून पोलीस इतर आरोपींच्या मागावर होते. यादरम्यान संशयीत आरोपी हे पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले यांच्या पथकाने अन्सारी आणि आलम यांना अटक केली.