मराठ्यांचे वादळ मुंबईच्या वेशीवर, सरकारकडून वाशी टोलनाक्यावर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, ईस्टन फ्री वे आणि चेंबूरवर दोन्ही मार्गावर पोलीस तैनात

मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी प्रशासन सज्ज असून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची  तयारी केली आहे. 

  मुंबई : मनोज जरांगे थोड्याच वेळात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दुपारी २ वाजता मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षण मागणीसाठी  वाशीमध्ये जमलेल्या लाखो जनसमुदायाने मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता  आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स नवी मुंबईत दाखल झाले आहे. तर मुंबई पोलीसांनी  चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची  तयारी केली आहे.

  कायदा आणि सुव्यवस्थेसाठी खबरदारी

  मराठा वादळ मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. सीएसएमटीसमोर मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाशी टोलनाका येथे आता रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सची टीम दाखल झाली आहे. या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल स्थानिक वाहतूक पोलीस नवी मुंबई पोलीस दाखल झाले आहेत.

  जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबई पोलीस आणि प्रशासन सज्ज

  मुंबई पोलिस देखील सज्ज  झाले आहेत. जरांगे आणि मराठा आंदोलकांच वाशीहून मुंबईत येण्याचा ठरलं तर, मुंबई पोलिसांनी चेंबूर ते आझाद मैदानात जाणाऱ्या दोन्ही मार्गांची तयारी केली आहे.   मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात  मराठा आंदोलन वाशीहून चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर चेंबूरहून दोन मार्गे आझाद मैदानात जाता येतं.यात एक ईस्टर्न फ्री वे  आणि दुसरा चुनाभट्टी सायन सिटी मार्ग हा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस या दोन्ही मार्गावर आंदोलकांना जाण्यासाठी तयारी केलीय.मात्र ईस्टन फ्री वे नेच आंदोलकांनी जावं यासाठी पोलीस विनंती करणार आहेत.

  ईस्टन फ्री वे ने येण्याची करणार विनंती

  आज 26 जानेवारी असल्याने सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे सिटी रस्त्याने वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे 16.8 किलोमीटरचा ईस्टर्न फ्री वे  हा मार्ग पूर्ण करत मराठा आंदोलक सहज आझाद मैदानात पोहोचू शकतील. त्यामुळे पोलीस मराठा आंदोलकांना विनंती करतील अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मात्र यात एक पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या या वाशीतच असताना पूर्ण करतं का की त्यांना मुंबईत यायला लावतं.