भारतात तब्बल २८० लाख जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त

जागतिक आयव्हीएफ दिनाच्या निमित्ताने भारत सिरम्स अँड व्हॅक्सीन्स लिमिटेडने (बीएसव्ही) इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेलंबींग (आयएचडब्ल्यू) कौन्सिलच्या सहकार्याने तिसऱ्या इंडिया आयव्हीएफ शिखर परिषदेचे आयोजन केले होते.

  मुंबई: जागतिक आयव्हीएफ दिनाच्या निमित्ताने भारत सिरम्स अँड व्हॅक्सीन्स लिमिटेडने (बीएसव्ही) इंटिग्रेटेड हेल्थ अँड वेलंबींग (आयएचडब्ल्यू) कौन्सिलच्या सहकार्याने तिसऱ्या इंडिया आयव्हीएफ शिखर परिषदेचे आयोजन केले होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेमध्ये एकूण पाच सत्रे पार पडली. ज्यामध्ये भारतामध्ये उपलब्ध असलेले, वंध्यत्वावरील उपचार आणि आयव्हीएफ याविषयीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (नियंत्रण) विधेयक, २०२१, युवावर्गामध्ये वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणाची कारणे, वंध्यत्वावरील उपचारांमधील रुग्णकेंद्रित दृष्टिकोन आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानातील भविष्यातील क्रांती हे या सत्रांमध्ये चर्चिले गेलेले महत्त्वाचे विषय होते.

  नीती आयोगाचे वरिष्ठ सल्लागार (आरोग्य) डॉ. के. मदन गोपाल यांनी सांगितले, “सर्वांना सहज उपलब्ध होऊ शकतील आणि परवडण्याजोग्या असतील अशा आरोग्य देखभाल सेवांना सरकारने प्राधान्य दिले आहे. रुग्णकेंद्रित उपक्रम राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. पण सार्वजनिक आरोग्य सेवासुविधांमध्ये वंध्यत्वाचा समावेश करण्यासाठी आपल्या अधिक जास्त संशोधन करणे आणि माहिती मिळवणे गरजेचे आहे.”

  ब्लूम आयव्हीएफचे वैद्यकीय संचालक आणि एफओजीएसआयचे प्रेसिडेंट-इलेक्ट डॉ. ऋषिकेश पै म्हणाले, “आपल्या माननीय पंतप्रधानांच्या व्हिजनला साथ देत, आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांनी समाजाच्या ऋणांची परतफेड केली पाहिजे आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये आयव्हीएफचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

  अहवालांमधून हाती आलेल्या माहितीनुसार, भारतात तब्बल २८० लाख जोडपी वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहेत, पण या माहितीमध्ये आणि वास्तवात बरीच तफावत असू शकते कारण सामाजिक व मानसिक बंधनांमुळे अनेक जोडपी या समस्येबद्दल उघडपणे बोलण्यास धजावत नाहीत. भारतामध्ये वंध्यत्वाच्या समस्येचे स्वरूप आणि उपलब्ध असलेले आयव्हीएफ उपचार याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरीनेच या शिखर परिषदेने वंध्यत्व आणि त्यावरील उपचारांविषयीच्या गैरसमजुती आणि सामाजिक कलंकांचे खंडन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

  मुंबईतील लीलावती हॉस्पिटल ब्लूम आयव्हीएफ सेंटर – मुंबईच्या अध्यक्ष आयएसएआर, इन्फर्टिलिटी विशेषज्ञ आणि वैद्यकीय संचालिका डॉ. नंदिता पालशेतकर यांनी ग्रामीण आणि शहरी भागात आढळून येणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्येच्या कारणांविषयी चर्चा केली आणि वंध्यत्वाच्या समस्येचा समावेश असंसर्गजन्य आजारांमध्ये केला जावा अशी विनंती धोरणकर्त्यांना केली.

  थेरेपीसाठी येणाऱ्या जोडप्यांचे मानसिक आरोग्य नीट राहावे यासाठी त्यांचे कौन्सिलिंग करणे महत्त्वाचे आहे या मुद्द्यावर विशेषतज्ञांनी भर दिला. धोरण संरचना आणि पायाभूत सोयीसुविधांमध्ये अधिकाधिक सुधारणा घडून येण्यासाठी भारतामध्ये आयव्हीएफ व वंध्यत्वावरील उपचारांविषयी लोकांच्या धारणा आणि उपलब्ध असलेली माहिती यांच्यातील तफावत कमी होणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.