सोलापुरात सेन्च्यूरी पार केलेले तब्बल ३२०० मतदार; स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीतील साक्षिदार

सोलापूर जिल्ह्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केलेले तब्बल तीन हजार २०० मतदार आहेत. त्यात देश स्वातंत्र्य झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत मतदान केलेले देखील काहीजण आहेत. अजूनही अनेकांची तब्येत ठणठणीत आहे.

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केलेले तब्बल तीन हजार २०० मतदार आहेत. त्यात देश स्वातंत्र्य झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत मतदान केलेले देखील काहीजण आहेत. अजूनही अनेकांची तब्येत ठणठणीत आहे. आता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८५ वर्षांवरील वृद्ध मतदारांना त्यांच्या घरी बसून देखील मतदान करण्याची सोय उपलब्ध असणार आहे.

  दुसरीकडे केंद्रांवर येऊनही त्यांना मतदान करता येणार आहे. कोरोना महामारीत देखील रोगप्रतिकारक शक्तीच्या बळावर तरुणांनाही मागे टाकलेले जिल्ह्यात ८५ वर्षांवरील तब्बल ५५ हजार मतदार आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मतदान केंद्रावर येण्याचे आवाहन केले जात आहे. पण, त्यांना घरबसल्या मतदान करायचे आहे की केंद्रावर येऊन, यासंदर्भातील अर्ज बीएलओंच्या माध्यमातून भरून घेतले जात आहेत. त्यापैकी किती वृद्ध मतदार केंद्रावर येऊन मतदान करतील हे १७ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. तरीपण, वयाचे शतकपूर्ती केलेल्यांपैकी एक ते दीड हजार मतदार केंद्रांवर येऊन मतदान करतील, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.

  एक-दोन दिवस अगोदर मतदान

  विशेष म्हणजे, ८५ वर्षांवरील बऱ्याच उमेदवारांनी शासकीय मदतीशिवाय स्वत:हून मतदान केंद्रांवर येऊन मतदान करण्याची ग्वाही बीएलओंना दिली आहे. दुसरीकडे जे वृद्ध मतदार घरी बसून मतदानाचा पर्याय निवडतील त्यांचे मतदान जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत स्वतंत्र पथकांच्या उपस्थितीत होईल. त्यांच्या मतपत्रिका जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केल्या जाणार आहेत. ज्यांनी घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे, त्यांच्या घरी जाऊन मतदानाच्या एक-दोन दिवस अगोदर मतदान करून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  घरबसल्या, केंद्रावर मतदानाचा पर्याय

  ८५ वर्षांवरील ५४ हजार ९९१ वृद्ध मतदारांसह ४० टक्क्यांवरील दिव्यांग २७ हजार १९४ मतदारांना मतदान केंद्रावर की घरबसल्या मतदान करायचे यापैकी एक पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी बीएलओंच्या माध्यमातून अर्ज भरून घेतले जात आहेत. यापैकी ज्या मतदारांना मतदान केंद्रावर यायचे आहे, पण वाहनाची आवश्यकता असेल त्यांना तशी मागणी अर्जात नोंदवायची आहे. त्यानंतर मतदानाच्या दिवशी संबंधितांना केंद्रावर आणण्यासाठी शासनाच्या वतीने वाहनाची सोय केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सांगितले.