
आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना बसलाय. त्यांना गावकऱ्यांनी गावात येण्यापासून रोखलं आहे.
सिल्लोड : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा (Maratha) समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना बसलाय. त्यांना गावकऱ्यांनी गावात येण्यापासून रोखलं आहे. पण वेगळ्या कारणासाठी सत्तारांना हुसकावून लावण्यात आलं.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. पोरांनी हुल्लडबाजी करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी ‘अब्दुल सत्तार चले जाव’च्या घोषणा दिल्या. काही पोरं तर वाहनांच्यामागे धावत होते. गावकऱ्यांचं हे उग्र रुप पाहून अब्दुल सत्तार यांनी गावातून काढता पाय घेतला.
विशेष म्हणजे सत्तार यांच्या ताफ्यात पोलिसांची व्हॅन होती. पोलिसांनीही या जमावाला रोखलं नाही. गावकऱ्यांना मोठ्या संख्येने जमलेलं पाहून सत्तार यांचा ताफा आला तसा सुसाट वेगाने गावातून निघून गेला. सत्तार गेल्यानंतरही गावकरी गावाच्या वेशीवर थांबूनच होते. सत्तार यांना गावात येऊच द्यायचं नाही, असा चंगच या गावकऱ्यांनी बांधला होता.
गावबंदीच कारण काय ?
अब्दूल सत्तार यांना गावकाऱ्यांनी पळवून लावल्याचं वेगळंच कारण समोर आलं आहे. बोरगाव सावरणी येथे काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू संशयास्पद झाला होता. याप्रकरणात सत्तार यांच्या राजकीय दबावामुळे पारदर्शक चौकशी होत नसल्याचा काही ग्रामस्थांचा आरोप असून या रागाच्या भरातून सत्तारांना गावात येण्यापासून रोखण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी याप्रकरणात पोलिसांकडे या प्रकरणाचा निष्पपणे तपास करण्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणाचं सत्य बाहेर आणण्याचीही विनंती गावकऱ्यांनी केली आहे.