धंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; आक्रमक झालेले बागुल म्हणाले, ‘आम्ही कोणाच्या चपला उचलणार नाही’

पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

  पुणे : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमदवाराची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये पुण्यातून काँग्रेसनं आमदार रवींद्र धंगेकर यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

  आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल आक्रमक झाले आहेत. मी कोणाच्याही चपला उचलणार नाही. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात, मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित करत आबा बागुल भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले.

  माझ्यात काय कामी होती? – बागुल

  आबा बागुल यांना पुणेकरांनी सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. मात्र तरीदेखील आपल्याला डावललं जात असल्याची भावना आबा बागुल यांची आहे. माझ्यात काय कामी होती, अशी विचारणा आबा बागुल यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केली आहे.

  निष्ठावंतांवर अन्याय

  सध्या विद्यमान आमदार असताना धंगेकरांना लोकसभेचं तिकीट देणं कितपत योग्य आहे, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. पुणे काँग्रेसमध्ये या निर्णयामुळे खदखद आहे. निष्ठावंतांवर अन्याय करुन नुकत्याच पक्षात आलेल्याला उमेदवारी देऊन काय साध्य केले? असा सवाल आबा बागुल यांनी उपस्थित केला.

  काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार

  काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मी भेटलो आहे. मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा भेटून मी माझी क्षमता सांगितली. मात्र तरी मला डावलंल गेलं. पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलं आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. आम्ही महात्मा गांधींना मानणारे आहोत. लोकशाही मार्गाने काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार असल्याचा इशारा देखील बागुल यांनी दिला आहे.