सराईताला खाक्या दाखवताच चोरट्याला फुटला घाम; अनोख्या पद्धतीने चोरीचा गुन्हा उघड

कौटुंबिक सोहळा सुरू असताना नजर चुकवून कपाटात ठेवलेले ८ तोळ्यांचे दागिने चोरी झाल्या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलिसांनी अनोख्या पद्धतीने करत चोरीचा गुन्हा उघड केला.

  पुणे : कौटुंबिक सोहळा सुरू असताना नजर चुकवून कपाटात ठेवलेले ८ तोळ्यांचे दागिने चोरी झाल्या प्रकरणाचा तपास कोंढवा पोलिसांनी अनोख्या पद्धतीने करत चोरीचा गुन्हा उघड केला. दुसऱ्या गुन्ह्यातील सराईताला खाक्या दाखविला अन् या चोरीतील संशयित उच्चशिक्षीत तरुणाला घाम फुटला. त्याने क्षणातच चोरी मान्य करून चोरलेले दागिने पोलिसांना परत केले.

  याप्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तानाजी घुले (रा. कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक दिनेशकुमार पाटील, विशाल मेमाणे, निलेश देसाई व त्यांच्या पथकाने केली आहे.

  तक्रारदार तानाजी घुले यांच्या घरी कौटुबिंक सोहळा होता. त्यानिमित्ताने नातेवाईक तसेच इतर परिचितांना घरी बोलवले गेले होते. घरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. याचदरम्यान, उघड्या दरवाजातून बेडरूममध्ये शिरून कपाटातील ८ तोळे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले. हा प्रकार ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली होती.

  याप्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेने सहाय्यक निरीक्षक दिनेशकुमार पाटील आणि त्यांचे पथक करत होते. पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर घरातीलच कोणीतरी ही चोरी केल्याचा संशय बळावला. तपासात एका तरुणावर संशय आला. तो एलएलबीचे शिक्षण घेत असल्याचेही समजले. पोलिसांनी नामी शक्कल लढवत त्याला येथे बोलवून घेतले आणि दुसऱ्या दोन सराईतांच्या जवळ उभा केले.

  पोलिसांनी दुसऱ्या एका गुन्ह्याची चौकशी सराईतांकडे सुरू केली. त्यांना पोलिसी खाख्या दाखविला अन् इकडे त्या तरुणालाच घाम फुटला. आता आपल्याकडेही अशीच चौकशी होईल या भितीनेच त्या तरुणाने पोलिसांना लागलीच माहिती देत आपण घरातून चोरी केल्याचे सांगितले. लागलीच त्याच्याकडून चोरीस गेलेले ४ लाखांचे ८ तोळ्याचे दागिने जप्त केले.
  तरुण तक्रारदारांचा दुरचा नातवेवाईक असून, तो एका महाविद्यालयात एलएलबीचे शिक्षण घेत असल्याची पोलिसांनी दिली आहे.