बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे समोर येताच आदित्य ठाकरे भावुक, म्हणाले…

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र माध्यमांशी बोलण्यापूर्वी शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे अचानक समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांचा विधान भवनाबाहेर संवाद झाला.

    मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध केले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. त्यानंतर आज त्यांची कसोटी लागणार होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मतदानाने त्यांनी बहुमत सिद्ध केले. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध १०७ मतांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जिंकली.

    दरम्यान यानंतर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र माध्यमांशी बोलण्यापूर्वी शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे अचानक समोर आले. यावेळी दोघांची भेट झाली. त्यानंतर प्रकाश सुर्वे आणि आदित्य ठाकरे यांचा विधान भवनाबाहेर संवाद झाला. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं. तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही त्या दिवशी जेवण ठेवलं होतं आणि मी येतच होतो, पण असू द्या, असे आदित्य ठाकरे प्रकाश सुर्वे यांना म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे हे प्रकाश सुर्वेंशी संवाद साधताना भावुक झाल्याचे दिसून आले.

    दरम्यान, शिवसेना कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीपेक्षाही जास्त ताकद घेऊन विधान भवनात येईल आणि भगवा फडकवेल. तसेच राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच २० मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याबाबत विचारले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.