As soon as the reservation was announced, the candidates were tested by the parties.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. आरक्षणानुसार ताकदीच्या उमेदवारांचा पक्षाच्या नेत्यांनी शोध सुरू केला आहे. नगरपालिकेचे राजकारण हेच ध्येय मानून कार्यरत असणा-या काहींनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे.

    यवतमाळ : जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांमध्ये महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून नगर परिषद उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठी प्रत्येक उमेदवार आपला दावा दाखल करीत आहे. तर यंदा प्रभाग रचनेत मोठा फेरबदल झाल्याने नवखे उमेदवारही निवडणूक रिंगणात सक्रिय झाले आहे. एकंदरीत प्रत्येक प्रभागांमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा ज्वर चढल्याचे वातावरण दिसून येत आहे.

    आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. आरक्षणानुसार ताकदीच्या उमेदवारांचा पक्षाच्या नेत्यांनी शोध सुरू केला आहे. नगरपालिकेचे राजकारण हेच ध्येय मानून कार्यरत असणा-या काहींनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली आहे. तसेच, पक्ष श्रेष्टीकडे निवडणुकीची तयारी देखील दर्शविली आहे. यात अनेक नवखे उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवीत आहे. त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेत आहेत.

    तर एकाच प्रभागातून दोन ते तीन वेळा निवडून आलेले विविध राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक आपली दावेदारी कायम समजून प्रभागात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. मात्र निवडणूक महाविकास आघाडी विरूध्द व भाजप यांच्यातच होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे नव्या प्रभाग रचनेतील फेरबदल लक्षात घेता सक्षम उमेदवार मिळावा म्हणून महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढणार असून काही ठिकाणी त्यांची छुपी युती राहणार असल्याचे जाणकार सांगत आहे.

    गेल्या पाच वर्षांत पालिकेत नगराध्यक्ष आणि पालिका सदस्य यांच्यामध्ये कधीही समन्वय दिसून आला नाही. सदस्यांच्या निर्णयाला नगराध्यक्षांचा विरोध आणि नगराध्यक्षांच्या कामाला सदस्यांचा विरोध अशीच परिस्थिती पहावयास मिळाली. त्यामुळे शहरातील उद्यानांचे सौदर्यीकरण, पालिका उत्पन्न वाढीसंदर्भात उपाययोजना, अशी अनेक कामे खितपत पडलेली आहेत. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केवळ अंतर्गत राजकारणामुळे संपूर्ण शहराचा विकास रखडला आहे. आता प्रभाग रचना आणि आरक्षण जवळपास निश्चित झाल्याने पालिकेच्या निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होवू शकतात. त्यामुळे नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढल्याचे दिसून येत आहे.