पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने राहिवाशांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

चिकणघर शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एकत्रित पुनर्विकास सन २०११ पासून हाती घेतलेला असून अद्याप २०२४ पर्यंत एक सक्षम विकासक म्हणून पूर्ण केलेला नाही.

    कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (म्हाडाचा घटक असलेली संस्था) या संस्थेचा १३ वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास व २८ हुन महिन्यांचे थकवलेले मासिक घरभाडे याप्रकरणी बेजबाबदार विकासकाच्या विरु‌द्ध या रहिवाशांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात केली आहे. पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयासमोर प्रकल्पाच्या बाहेर हे रहिवासी उपोषणाला बसले आहेत.

    चिकणघर शांतिदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा एकत्रित पुनर्विकास सन २०११ पासून हाती घेतलेला असून अद्याप २०२४ पर्यंत एक सक्षम विकासक म्हणून पूर्ण केलेला नाही. तसेच पुनर्विकास नियमावलीनुसार पर्यायी व्यवस्था म्हणून देय असलेले २८ हुन महिन्याचे मासिक घरभाडे रखडवून ठेवलेले आहे. वैयक्तिक करारनामा करून दिलेला नाही. कॉर्पस फंडाची रक्कम करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे अद्याप दिलेली नाही.

    पुनर्विकास करारनाम्यानुसार नमूद केल्याप्रमाणे एक सक्षम विकासक म्हणून कोणत्याही बार्बीची पूर्तता संबंधित विकासक करू शकला नाही. उलटपक्षी विकसकाने संस्थेच्या मिळकतीवर तसेच सभासदांच्या लिजहोल्ड राइट्स व पुनर्विकासाच्या बार्बीची पूर्तता केलेली नाही. या प्रकरणी विकासका विरुद्ध मुख्याधिकारी म्हाडा यांच्या कार्यालयात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. १६/०२/२०२१ व १६/०३/२०२१ घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान विकासकाने लिहून दिलेल्या सत्यप्रतिज्ञा पत्रावर लिहून दिल्या प्रमाणे कोणत्याही बाबींची पूर्तता केली नसून सभासदांची कायमच दिशाभूल केल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.

    विकासकाने घेतलेला MIG1 एकत्रित पुनर्विकास हा मध्यम उत्पन्न गट १ करिता असून थकविलेल्या मासिक घरभाडेमुळे व बंद असलेल्या इमारतीच्या बांधकामामुळे बहुतांश सभासद मयत झाले आहेत. उर्वरित सभासदांना आपल्यामुळे आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. याबाबत विकासकाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील विकासक लक्ष देत नसल्याने येथील १८४ सदनिका धारक यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत या फ्लॅटचा ताबा कधी मिळणार हे विकासक लेखी लिहून देत नाही आणि थकीत महिन्यांचे घरभाडे देत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.