
पिंपरी - चिंचवड शहरातून दररोज सरासरी ५० हजार प्रवासी मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातून स्वत:च्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी ते मेट्रो स्थानकापर्यंत येतात. मात्र, पिंपरीसह शहरातील सहाही मेट्रो स्थानकांच्या परिसरात वाहनतळ (पार्किंग) नसल्याने वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातून दररोज सरासरी ५० हजार प्रवासी मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातून स्वत:च्या दुचाकी, चारचाकी वाहनांनी ते मेट्रो स्थानकापर्यंत येतात. मात्र, पिंपरीसह शहरातील सहाही मेट्रो स्थानकांच्या परिसरात वाहनतळ (पार्किंग) नसल्याने वाहने उभी करायची कुठे असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
पुण्यात विविध भागात जाणे शक्य
पिंपरीतून फुगेवाडीपर्यंत धावणारी मेट्रो १ ऑगस्टपासून शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत धावू लागली आहे. तेथून पूर्वेला पुणे स्टेशन, रूबी हॉल क्लिनिक स्थानक आणि पश्चिमेला कोथरूड वनाजपर्यंत जाता येत आहे. पुणे मेट्रोची स्वारगेट ते पिंपरी मार्गिका शहरात आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका इमारत (पीसीएमसी), संत तुकारामनगर (वल्लभनगर), भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी अशी सहा स्थानके आहेत. ६ मार्चपासून पिंपरी ते फुगेवाडीपर्यंत मेट्रो धावत होती. तिचा उपयोग केवळ हौस म्हणून नागरिक करीत होते. १ ऑगस्टपासून पुण्यातील सिव्हिल कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रो धावत आहे. तिथे उतरून वनाज तेरामवाडी मेट्रो मार्गाने वनाजपर्यंत आणि रामवाडीच्या दिशेने रूबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत जाता येत आहे. त्यामुळे शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, पुणे रेल्वेस्थानक, बालगंधर्व, डेक्कन, गरवारे कॉलेज, नळ स्टॉप, आनंदनगर, कर्वेरोड, वनाज आदी स्थानकांवर उतरून पुण्यात विविध भागात जाणे शक्य झाले आहे. त्याचा लाभ सामान्य प्रवाशांसहविद्यार्थी, नोकरदार वर्ग घेऊ लागले आहेत. त्यामुळे मेट्रो प्रवासी संख्याही वाढली आहे. बहुतांश जण दुचाकी किंवा चारचाकी वाहनांनीमेट्रो स्थानकापर्यंत येतात. मात्र, त्यांची वाहने उभी करण्यासाठी स्वतंत्र वाहनतळच नसल्याने गैरसोय होत आहे.
मेट्रो मार्गाच्या पिलरच्या मध्ये वाहने उभी केली जात आहेत
पिंपरी स्थानक परिसरात पुणे – मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत मेट्रो मार्गाच्या पिलरच्या मध्ये वाहने उभी केली जात आहेत. स्थानकाच्या विरुद्ध दिशेच्या सेवा रस्त्यावर महापालिकेने ‘पे अँड पार्क’ केले आहे. ती जागा पुरेशी नाही. मेट्रो प्रवाशांसाठी स्वतंत्र वाहनतळ नाही. वल्लभनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी स्थानकांच्या परिसरातही अशीच स्थिती आहे. कासारवाडी, फुगेवाडी व दापोडी स्थानकांच्या एका बाजूला कंपन्या, नागरी वस्ती आणि दुसर्या बाजूला सीएमईची सीमा भिंत आहे. त्यामुळे महामार्गाच्या सेवा रस्त्यालगतच वाहने उभी केली जातात. शहरातील उपनगरातून मेट्रो स्थानकांपर्यंत येण्यासाठी पीएमपीएलने बस सेवा सुरू केली आहे. काही वर्तुळ मार्ग असून काही सरळ मार्ग आहेत.
पिंपरी – नेहरूनगर – यशवंतनगर – मोरवाडी – पिंपरी डीलक्स चौक – काळेवाडी – थेरगाव – डांगे चौक – चिंचवड लिंकरस्ता – पिंपरीस्थानक, दापोडी – जुनी सांगवी – नवी सांगवी – पिंपळे गुरव – दापोडी स्थानक अशा मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर धावणार्या पीएमपीएल बससुद्धा महामार्गाच्या सेवा रस्त्यालगतच प्रवाशांना सोडतात. प्रवासी घेण्यासाठीही तिथेच उभ्या केल्या जातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करायला हवी.
''मेट्रो स्थानकांच्या परिसरात स्वतंत्र वाहनतळ उभारण्याचे नियोजन नाही. 'आय टु आर' अंतर्गत (औद्योगिक ते निवासी) असलेला कासारवाडी येथील एक भूखंड मेट्रोला देण्याचे नियोजन होते. त्यावर मेट्रो स्वत: वाहनतळ विकसित करणार होती. पुढे काही चर्चा झाली नाही. अन्य ठिकाणच्या वाहनतळांबाबत अद्याप काही ठरलेले नाही.''
- मकरंद निकम (शहर अभियंता - महापालिका)
''मेट्रोची स्वतंत्र पार्किंग सुविधा नाही. त्यासाठी महापालिकेला पत्र दिले आहे. त्यांचे मेट्रो स्थानकालगत पार्किंग प्लॉट असल्यास संयुक्तपणे विकसित करण्याचे विचाराधीन आहे. वल्लभनगर येथील राज्य परिवहन महामंडळाची जागा घेऊन पार्किंग केली जाणार आहे. अंतर्गत भागांना पीएमपीएलद्वारे मेट्रोशी जोडण्याचेही नियोजन आहे.''
- डॉ. हेमंत सोनवणे (कार्यकारी संचालक - मेट्रो)