…तर मग गोडसेंची अवलाद कोण आहे हे सांगा?’ फडणवीसांच्या ‘औरंगजेबाच्या अवलादी’वर असुदुद्दीन ओवेसींची टीका

कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचं स्टेटस लावण्याचे प्रकार समोर आले होते. तर नगरमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचं पोस्टर दाखवण्यात आलं होतं. यावरुन फडणवीस यांनी औरंगजेबावरुन विधान केलं होतं.

    हैदराबाद: राज्यातील औरंगजेबाचा (Aurangazeb) वाद आता राष्ट्रीय पातळीवर वाढत चालल्याचं दिसतं आहे. कोल्हापुरात शिवराज्याभिषेकाच्या दिवशी काही समाजकंटकांनी औरंगजेब आणि टिपू सुल्तानच्या फोटोचे स्टेटस ठेवले होते. यावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यानंतर कोल्हापुरात काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (DCM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात औरंगजेबाच्या अवलादी अचानक वाढल्या असल्याचं विधान केलं होतं. यावर आता एमआयएमच्या असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिलीय. तर मग गोडसे यांच्या अवलादी कोण आहेत ते सांगा, असं प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस हे एवढे तज्ञ आहेत, हे मला माहित नव्हतं. फडणवीसांना सगळं माहित असतं का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

    नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
    कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचं स्टेटस लावण्याचे प्रकार समोर आले होते. तर नगरमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचं पोस्टर दाखवण्यात आलं होतं. यावरुन फडणवीस यांनी औरंगजेबावरुन विधान केलं होतं. महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांत औरंगजेबाच्या अवलादी निर्माण झालेल्या आहेत. ते औरंगजेबाचे फोटो ठेवतायेत, स्टेटस लावतायेत आणि फोटो दाखवत आहेत. यामुळं समाजात द्वेष आणि तणाव निर्माण होतोय. प्रश्न असा आहे की अचानक औरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या आहेत. यांचे खरे मालक कोण आहेत ते आम्ही शोधून काढू. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, या ठिकाणी औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही.