सावळजमध्ये ‘आशा’ नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात! विरोधक आक्रमक, चौकशीच्या मागणीसह आंदोलनाचा इशारा

सावळज येथे ग्रामपंचायतीत बोगस ग्रामसभा घेऊन प्रोसिडींगमध्ये फेरबदल करून आशा सेविकांची निवड केली असल्याचा आरोप विरोधी गटाच्या सदस्यांनी केला असून याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आशा सेविकांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योग्य चौकशी करून न्याय न दिल्यास उपोषणाचा इशारा ही विरोधकांनी दिला आहे.

  तासगांव : सावळज येथे ग्रामपंचायतीत बोगस ग्रामसभा घेऊन प्रोसिडींगमध्ये फेरबदल करून आशा सेविकांची निवड केली असल्याचा आरोप विरोधी गटाच्या सदस्यांनी केला असून याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आशा सेविकांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. योग्य चौकशी करून न्याय न दिल्यास उपोषणाचा इशारा ही विरोधकांनी दिला आहे.

  येथे रिक्त असलेल्या आशा सेविका नियुक्तीसाठी ग्रामसभा घेण्यात आली होती. यावेळी अर्जदारांकडून प्राप्त झालेले अर्जाचे गुणांकन करून उमेदवारांची निवड केली तर होती. सदर निवडीसाठीचे सर्व निकष अर्जाची पडताडणी व सत्यता पाहुन ग्रामसभेद्वारे निवड करण्यात आली होती, असा ठराव ही मंजुर करण्यात आला. परंतु, ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभेमध्ये झालेला ठराव प्रोसिडिंग मध्ये न लिहता परस्पर खोटे प्रोसिडींग व ठराव ग्रामसभेच्या प्रोसिडींगमध्ये लिहून स्वतःच्या मर्जीतील उमेदवाराची निवड केली आहे, असा आरोप विरोधी गटाचे सदस्य योगेश पाटील व ऋषिकेश बिरणे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

  -सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्ष उफाळला
  सदर घटनेची दखल घेऊन सत्यता पडताळणी, करून आपण योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी करीत अन्यथा झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही तासगाव पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ही देण्यात आला आहे. आशा सेविकांची नियुक्तीवरून भाजपाचे विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्ष उफाळला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी चौकशी करून कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  निकष व नियमानुसारच नियुक्ती
  येथील रिक्त आशा सेविकांच्या नियुक्तीबाबत सर्व निकष व नियमानुसारच नियुक्ती करण्यात आली आहे. काही उमेदवारांना तीन अपत्ये असल्याने नियुक्ती निकषात अडचणी आल्या. मात्र झालेली निवड नियमांनुसार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एस. ए. देसाई यांनी दिली.