ashok chavan

भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चव्हाण यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाय सुरक्षेत श्रेणीसुधार करून ती वाय प्लस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चव्हाण यांना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाय सुरक्षेत श्रेणीसुधार करून ती वाय प्लस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

    राज्य पोलिसांनी चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी आणि त्यांच्या नांदेड येथील बंगल्यावरही सुरक्षा वाढवली आहे. चव्हाण यांना याआधी वाय श्रेणीचे सुरक्षा कवच होते. आता मिळणाऱ्या वाय प्लस सुरक्षा कवचात दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपाने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. यात त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणाही मंगळवारी करण्यात आली.

    भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या जिवाला धोका असू शकतो ही शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    कशी असते वाय सुरक्षा?

    वाय दर्जाची सुरक्षा सामान्यतः उच्च जोखीम असलेल्या लोकांना दिले जाते. यामध्ये व्यक्तीच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पाच सशस्त्र रक्षकांसह चोवीस तास तीन शिफ्टमध्ये काम करणारे सहा खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) तैनात करणे समाविष्ट आहे.