Will decide political direction in a day or two," Ashok Chavan's first reaction after resignation

  Ashok Chavans First Reaction After Resignation : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन भूकंप होत असताना, आज पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खोचक टोला लगावताना, काँग्रेसने त्यांना खूप दिले असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर अशोक चव्हाणांनी जोरदार पलटवार करीत चोख प्रत्त्युत्तर दिले आहे.
  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी
  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी घडत असताना, आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. मी माझ्या काँग्रेसच्या सर्व पदापासून राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर कोणत्या पक्षात जाणार, कोणती विचारधारा स्वीकारणार हे येत्या दोन दिवसांमध्येच कळेल, असे सूतोवाच केले आहे.
  अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा
  अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
  नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे. त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.”