Minister Ashok Chavan criticizes BJP

अशोक चव्हाण (Ashok Chavan Reaction On Uddhav Thckeray Resignation) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोसळल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Resignation) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. त्यामुळे उद्या बहुमत चाचणी घेण्याची गरज उरली नाही. भाजपचा (BJP) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं. दरम्यान अशोक चव्हाण (Ashok Chavan Reaction On Uddhav Thckeray Resignation) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोसळल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

    अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की,  महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारे सरकार दिले. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातील नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

    ते पुढे म्हणाले की, कोरोनासारखे महाभयंकर संकट ओढवले असतानाही जे-जे चांगले करता आले, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही अडीच वर्षात केला. नवीन सत्ताधाऱ्यांना माझ्या सदिच्छा आहेत आणि आम्ही सुरू केलेल्या लोकहिताच्या कामांमध्ये राजकारण होणार नाही, एवढी माफक अपेक्षा आहे.