ashok gehlot

सरकारं पाडण्यासाठी कट केले जात आहेत, असा आरोप अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस दिल्लीमध्ये सत्याग्रह आंदोलन करत आहे. त्यावेळी अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारं पाडण्यासाठी कट केले जात आहेत, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस दिल्लीमध्ये सत्याग्रह आंदोलन करत आहे. त्यावेळी अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

    “संविधानाची पायमल्ली केली जात आहे. सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाचा गैरवापर सुरु आहे. जेव्हा न्याय मिळत नाही तेव्हा आपण न्यायव्यवस्थेकडे जातो. पण आता न्यायवस्थेवर दबाव आहे. हा खूप धोकादायक खेळ आहे,” असं अशोक गेहलोत म्हणाले आहेत.


    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सर्व काही शक्य आहे. गुन्हे, अन्याय, अत्याचार सर्व काही शक्य असल्याचं गेहलोत म्हणाले. “भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नाही. फक्त सत्ता बळकावण्यासाठी लोकशाहीचा मुखवटा घालून राजकारण केलं जात आहे,” असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे.

    “हिंदुत्वाच्या नावाखाली देशात लोकशाही ढासळत आहे, लोकांना आता समजत नसलं पण नंतर पश्चाताप होईल. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असताना भाजपा घोडेबाजार करत सरकारं पाडत आहेत,” अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे. राजस्थानमधील आमदारांना आगाऊ रक्कम म्हणून १० लाख रुपये वाटण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.