
वसई : विरारमधील एका बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून,त्यांना १० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विरार पुर्वेला राहणारे बांधकाम व्यावसायिक प्रमोद देसले यांच्यावर २६ सप्टेंबरला दुपारी २ वाजता त्यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला होता.देसले हे आपल्या दिशांत बिल्डर्स या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले असता, बाहेर उभ्या असलेल्या एका गाडीतून उतरुन अज्ञात व्यक्तींंनी त्यांच्यावर बेस बाॅल च्या दांडेंनी हल्ला केला.त्यावेळी देसले यांनी वाचवा,वाचवा असा धावा केल्यावर नागरिक जमलेले पाहून हल्लेखोर निघून गेले. या हल्ल्यात देसले यांच्या उजव्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना लिलावती हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. हा हल्ला प्रमोद दळवी आणि श्रेयस म्हात्रे यांनी घडवून आणल्याचा संशय प्रमोद देसले यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला होता. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात ३२६,५०६,३४ कलमान्वये गुन्हा दाखल होवून पोलीस तपास करीत होते.
हा हल्ला का झाला याचे कारण मात्र, प्रमोद देसले यांनी नमुद केलेले नाही. बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती आणि सद्या शिवसेनेत असलेले सुदेश चौधरी यांचे बांधकाम व्यावसायिक प्रमोद देसले हे भागिदार आहेत.तर देसले यांनी संशयित म्हणून नाव घेतलेले प्रमोद दळवी हे उध्दव ठाकरे गटाचे विरारमधील नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणी विरारमध्य़े खळबळ उडाली होती. अखेर पोलीसांनी प्रतीक कृष्णा भोईर (२४), मनीष वसंत गायकवाड (२५), भावेश आत्माराम गवाले (२३), अमर मोहन शिर्के (२९), हितेश अंबादास नाईक (२६) आणि सारिम उर्फ साहिल या सहा जणांना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता, १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.