पंढरीची विधानसभा यंदा गाजणार! राज्यातील घडामोडींचा पंढरीच्या राजकारणावर पडणार थेट प्रभाव

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पंढरीतील राजकारणावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या जागेवर भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत.मात्र राज्याच्या राजकारणात भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांची भाजपसोबत युती झाल्याने पंढरपूरच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

    पंढरपूर: राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पंढरीतील राजकारणावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या जागेवर भाजपचे समाधान आवताडे हे विद्यमान आमदार आहेत.मात्र राज्याच्या राजकारणात भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांची भाजपसोबत युती झाल्याने पंढरपूरच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.सध्या या जागेवर भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,भाजपचे मा.आ.प्रशांत परिचारक यांचे नाव चर्चेत आहे.

    राज्याच्या राजकारणात गेलं दोन वर्षात अनेक मोठमोठे भूकंप पाहायला मिळाले आहेत.त्यामुळे एकेकाळचे कट्टर शत्रू म्हणवले जाणारे अनेक पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून सत्ता उपभोगत असल्याने त्याचा संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम होताना दिसून येत आहे.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत राज्याचे राजकारण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे.पक्ष स्थापनेच्या इतिहासापासून कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या शिवसेना व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच पक्षाची निर्मिती केलेल्या भाजप या दोन पक्षांची युती 2019 पर्यंत राज्याच्या व देशाच्या राजकारणात कार्यरत होती.मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा करायचा यावर एकमत न झाल्याने या  दोन मित्रपक्षात फूट पडली.आजवरचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या काँग्रेस तसेच राष्ट्रवादी या पक्षांना सोबत घेत शिवसेना पक्षाने महाविकास आघाडी स्थापन करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात २०१९ साली सरकार अस्तित्वात आले होते.विरोधी विचारसरणीच्या या तीन पक्षांच्या  सरकारमुळे राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे महविकास आघाडीचे सरकार अवघ्या दोन वर्षे वयाचे झाले असताना ठाकरे गटातील एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थक 40 आमदारांनी थेट आपल्याच शिवसेना पक्षाला भगदाड पाडत बंडोखरी करत भाजपच्या पाठिंब्याने २०२२ साली सत्ता स्थापन केली.हे कमी होते की काय म्हणून यंदा प्रमुख विरोधक म्हणून राज्याच्या राजकारणात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही या फुटी पासून अलिप्त राहता आले नाही तत्कालीन विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते अजित दादा पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट बाजूला काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप यांच्या महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राज्याच्या राजकरणात झांगडगुत्ता झाल्याचे पाहायला मिळाले.सध्या महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार समर्थक गट यांची सत्ता आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी या मतदासंघावर आपली दावेदारी सांगत या भागात आपले दौरे,भेटी तसेच कामास सुरूवात केली आहे.सोबतच याच वर्षी भारत राष्ट्र समिती या तेलंगणाच्या पक्षात सामील झालेल्या भगीरथ भालके यांनीही आपले लक्ष या मतदारसंघावर केंद्रित केले आहे. विद्यमान आमदार समाधान दादा अवताडे हेही भाजपकडून या मतदारसंघासाठी इच्छुक असून त्यांच्याकडून कामाचा जोरदार सपाटा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.या तिघां सोबतच भाजपचे नेते व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांमधूनही त्यांनी ही विधानसभेची निवडणूक लढवावी अशी प्रबळ इच्छा व्यक्त केली जात असल्याने यंदा पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजण्याची शक्यता आहे. सोबतच ही निवडणूक चौरंगी किंवा तिरंगी होईल आणि अगदी कमी मताधिक्याने निवडून येणारा उमेदवार आमदार होईल असे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केली आहे.

    अशा झाल्या आजवरच्या लढती
    आजवर या जागेसाठी दुरंगी लढत पाहायला मिळाली आहे.२००९ साली कै.आमदार भारत नाना भालके विरुद्ध मा.उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील,२०१४ साली भारत नाना भालके विरुद्ध प्रशांत परिचारक,२०१९ साली भारत नाना भालके विरुद्ध सुधाकर पंत परिचारक,तर २०२०  च्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विरुद्ध राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाली आहे.