20 हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात; पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

अपघातातील गाडी परत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लक्ष्मण राजे (54) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

    पिंपरी : अपघातातील गाडी परत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना चिखली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र लक्ष्मण राजे (54) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.17) चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली.

    याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघाताबाबत चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या अपघातातील गाडी तक्रारदार ह्यांना परत करण्यासाठी नरेंद्रराजे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत एक लाख रुपये ठरले. त्यापैकी 13 डिसेंबर रोजी 15 हजार रुपये व 15 डिसेंबर रोजी 55 हजार रुपये नरेंद्र राजे यांनी घेऊन उर्वरित पैशांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्य़ालयात तक्रार दिली.

    पुणे एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची शनिवारी पडताळणी केली असता सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र राजे यांनी 70 हजार रुपये लाच स्वीकारून 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने रविवारी चिखली पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना नरेंद्र राजे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नरेंद्र राजे यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसउप अधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, सुराडकर, चव्हाण यांच्या पथकाने केली.