मंडई परिसरातील रामेश्वर चौकात तरुणावर मध्यरात्री गोळीबार, कोयत्याने वार करून गोळीबार; मित्राच्या मर्डरचा बदला म्हणून हल्ला

महात्मा फुले मंडईत गजबलेल्या रामेश्वर चौकात मंगळवारी रात्री तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने भितीचे वातावरण पसरले असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मित्राच्या मर्डरचा बदला म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

    पुणे : महात्मा फुले मंडईत गजबलेल्या रामेश्वर चौकात मंगळवारी रात्री तरुणावर कोयत्याने सपासप वार करून गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने भितीचे वातावरण पसरले असून यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मित्राच्या मर्डरचा बदला म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

    शेखर अशोक शिंदे (वय 32, रा. नाना पेठ) असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात रूपेश जाधव, गणेश इमुल, निरजन कटकम, कृष्णा बिंटलिंग व कृष्णा गाजुल व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखर शिंदे याने तक्रार दाखल केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे हा मध्यवस्थीत राहण्यास आहे. शेखरच्या भावाने आरोपींच्या मित्र अक्षय वल्हाळ याचा खून केला आहे. त्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, शेखर हा रामेश्वर चौकातून रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरून निघाला होता. तो चालत्या दुचाकीवर फोनवर बोलत होता. त्यावेळी पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. त्याच्या डोक्याला पिस्तूल लावली व डोक्यात गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

    दरम्यान, वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शिंदेला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शेखर शिंदे हा या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.