
कर्मवीर आण्णांना शाळा उभारण्यासाठी सर्वाधिक मदत केली असेल तर नगर जिल्ह्याने केली आहे. नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) सर्वाधिक शाखा आहेत. घोगरगावच्या परिसरात शिक्षणाचे जाळे व्हावे, यासाठी घोगरगाव येथे १९६१ साली विद्यालयाची स्थापना केली.
श्रीगोंदा : कर्मवीर आण्णांना शाळा उभारण्यासाठी सर्वाधिक मदत केली असेल तर नगर जिल्ह्याने केली आहे. नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) सर्वाधिक शाखा आहेत. घोगरगावच्या परिसरात शिक्षणाचे जाळे व्हावे, यासाठी घोगरगाव येथे १९६१ साली विद्यालयाची स्थापना केली. गुणवत्ता वाढीसाठी या शाखेने येथील शिक्षकांनी मोठे प्रयत्न केले आहेत. रयतच्या शाळेत फक्त शिक्षण दिले जात नाही तर गुणवत्ता देखील पाहिले जाते. रयतमध्ये गुणवत्तेला कधीही तडजोड केली जात नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.
घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ४ लाख ५० हजार विद्यार्थी संख्या असलेली रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण संस्था असून, गुणवत्तेच्या बाबतीत प्रगतीपथावर असताना व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक विविध कोर्स विद्यार्थ्यांना देण्यात रयत शिक्षण संस्था अग्रेसर असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले.
स्थानिक राजकारणामुळे नागरिकांनी फिरवली पाठ?
देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या घोगरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसेच परिसरातील स्थानिक नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. तसेच या शाळेचे प्राचार्य गांगर्डे यांचे नियोजनात झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव दिसून येत होता. त्यामुळेच कार्यक्रमासाठी रयत सेवकांव्यतिरिक्त कोणीही दिसून आले नाही.