
पुणे : पुण्यातून अटक केलेल्या चार दहशतवाद्यांना आता 11 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याच्या कोथरूड भागातून पकडण्यात आलेले मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवाद्यांवर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात बनावट आधार कार्ड, आर्म अॅक्ट तसेच दुचाकी चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करून अटक केली होती. दरम्यान, ते गेल्या दीड वर्षांपासून एनआयएच्या देशविघातक कृत्य गुन्ह्यात फरार होते. राजस्थानातील चितोडगड स्फोटकाच्या वॉन्टेड आरोपी होते. त्यांच्यावर एनआयएने ५ लाखांचे बक्षिस देखील जाहिर केलेले होते.
25 जुलैपर्यंत होती पोलीस कोठडी
मोहम्मद युनूस साकी आणि इम्रान खान (रा. मध्यप्रदेश) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांना न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानुसार आता पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातील चितोडगड येथे मार्च २०२२ मध्ये स्फोटके आढळली होती. याप्रकरणातील ते फरार आरोपी आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ते पुण्यातील कोंढवा भागात राहत होते. पुण्यात ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत होते. त्यांनी या दीड वर्षात नेमकं पुण्यात काय केल याचा तपास आता सुरू करण्यात आला आहे. परंतु, ते काही तरी मोठी घातपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून सखोल तपास
पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्याकडून लॅपटॉपसोबतच एक पेन ड्राईव्ह, ड्रोन बनविण्याचे साहित्य, त्याचा बॉक्स देखील मिळाला आहे. तर पांढऱ्या रंगाच्या गोळ्या देखील सापडल्या आहेत. त्या गोळ्या स्फोटक असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, त्यांनी आधार कार्ड कोठून बनविले. ते ड्रोनचा वापर कशासाठी व कसा करणार होते, याचा तपास करायचा आहे, यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.