एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीच्या भावावर जीवघेणा हल्ला; बोलायच्या बहाण्याने भेटायला बोलावलं अन्…

एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणाने मैत्रिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. यावरून आरोपीने तिच्या भावाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी 18 वर्षीय जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.

    नागपूर : एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) तरुणाने मैत्रिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. यावरून आरोपीने तिच्या भावाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी 18 वर्षीय जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. सुमेध भुजबळ बारसागडे (वय 20 रा. बल्लारशाह, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

    जखमी तरुणाच्या बहिणीची सुमेधशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांमध्ये चॅटिंग होऊ लागली. मात्र, सुमेधने रात्री-बेरात्री फोन करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंटाळून तरुणीने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. संतापलेल्या सुमेधने तिचा पाठलाग सुरू केला. याबाबत जखमी तरुणालाही माहिती होते. गुरुवारी सायंकाळी तो अभ्यंकरनगर मार्गावर चहा पिण्यासाठी गेला होता.

    दरम्यान, सुमेधने त्याला फोन केला. बोलायच्या बहाण्याने भेटायला आला. तेथे दोघांमध्ये वाद झाला. सुमेध पूर्ण तयारीनेच आला होता. त्याने जखमी तरुणावर फायटरने हल्ला केला. जखमी तरुणाच्या मित्रांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता आरोपीने चाकू काढला. झटापटीत तरुणाला चाकू लागला. त्यामुळे तो जखमी झाला.