वकिलाच्या घरावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी देत साहित्यांचीही केली तोडफोड

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलाच्या घरावर काही जणांनी हल्ला करून साहित्यांची तोडफोड केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

    अमरावती : फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या एका वकिलाच्या घरावर काही जणांनी हल्ला करून साहित्यांची तोडफोड केली. तसेच त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

    ऍड. संजय रघुनाथ वानखडे (वय 48) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी संतोष अंभोरे, सचिन अंभोरे, गोपाल बाजड, रामदास बाजड, रोहित बाजड (सर्व रा. गाडगेनगर), महादेव खडसे, हिमांशू खडसे व अन्य चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवन कॉलनीत राहणारे ऍड. संजय रघुनाथ वानखडे हे शुक्रवारी रात्री घरीच होते. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी संतोष अंभोरे व इतरांनी हातात काठ्या व रॉड घेऊन वकिलाच्या घरावर हल्लाबोल केला. त्यावेळी संजयचे वडील रघुनाथ घराबाहेर बसून होते. त्यांना हल्लेखोरांनी मारहाण केली. वकील कुठे गेला आहे, त्याला बाहेर काढा, आज आपण त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी ते देत होते.

    दरम्यान, संजय आणि त्याचे कुटुंबीय एका खोलीत जमा झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या लाठ्यांनी टिनापासून बनवलेल्या खोलीवर हल्ला केला. सुमारे तासभर टिनाच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, संजय व त्याच्या कुटुंबीय बाहेर निघाले नाही. हल्लेखोरांनी बाहेरील कार व दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी 112 वर डायल करून ही माहिती पोलिसांना देण्यात आली.