विसर्जनादरम्यान महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला, ४३ जणांवर गुन्हा दाखल

महिलांवर चाकुने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी सकाळी जमावाच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव- गणपती विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर फटाके, गुलाल फेकला. त्यामुळे काही तरुणांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग आल्यामुळे जमावाने थेट दगडफेक सुरू केली. यावेळी झालेल्या तुफान दगडफेकीत तीन जण जखमी झाले.

    महिलांवर चाकुने वार करण्याचाही प्रयत्न जमावाने केला. विसर्जनाच्या दिवशी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी सकाळी जमावाच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुर्वेश यशवंत महाजन (वय २३, रा. विठ्ठल मंदिर चौक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

    महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या जयदुर्गा भवानी क्रिडा मंडळाचे कार्यकर्ते गणपती विसर्जन करून विठ्ठल मंदिर चौकात थांबले होते. याच चौकात महापौर महाजन यांचे घर आहे. दरम्यान, यावेळी एक गाव एक गणपती व श्रीराम मित्र मंडळ असे दोन्ही मंडळ त्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक नेत होते. या मिरवणूकीतील काही तरुण महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकून मोठ्याने आरडाओरड करीत होते. एक तरुण पेटलेले फटाके महाजन यांच्या घरावर फेकत होता. एकंदरीतच या प्रकरामुळे चौकात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी पुर्वेश महाजन यांच्यासह महेश महाजन, पुष्पक महाजन यांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना हटकले.