uday samant

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलीसांनी शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुखांसह सहा जणांना अटक केली आहे. पुण्यातील कात्रज चौकात रात्री सामंत हे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जाताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलीसांनी रात्रीत या सहा जणांना अटक केली असून, इतरांवर गुन्हा नोंद केला आहे.

    पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पुणे पोलीसांनी शिवसेनेच्या हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुखांसह सहा जणांना अटक केली आहे. पुण्यातील कात्रज चौकात रात्री सामंत हे आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जाताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलीसांनी रात्रीत या सहा जणांना अटक केली असून, इतरांवर गुन्हा नोंद केला आहे.

    बबनराव नारायण थोरात (वय ५०, रा. दादर), राजेश बाळासाहेब पळसकर (वय ३८, रा. एरंडवणा), संभाजी हनुमंत थोरवे (वय ५५), संजय हरीश्चंद्र मोरे (वय ४३), सुरज नथुराम लोखंडे (वय ३४) आणि चंदन गजाभाऊ साळुंखे (वय ४९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अनिकेत घुले, विशाल धनवडे, रुपेश पवार, गजानन थरकुडे यांच्यासह इतर ८ ते १० जणांवर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत उदय सामंत यांचे वाहन चालक विराज सामंत (रा. मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळानिर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे यासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असल्याने आमदार उदय सामंत हे देखील पुण्यात आलेले होते. सासवड येथे शिंदे यांची सभा झाली. यादरम्यान, शिवसेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा देखील पुण्यात दाखल झाली आहे. आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकात रात्री सभा होती. त्या सभेसाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झालेले होते. ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक कात्रज चौकात जमा झालेले होते.

    याचदरम्यान, आमदार उदय सामंत हे कात्रज चौकातून आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे निघाले होते. त्याचदरम्यान चौकात त्यांची गाडी अडवत शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्या गाडीची काच फुटली गेली. हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, सामंत यांच्यावर जीवे घेणा हल्ला केला असल्याचे दिसून येत असल्याने याप्रकरणात पोलीसांनी खूनाचा प्रयत्न गुन्हा दाखल केला. हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी केलेल्या चिंतावणीमुळेच हा हल्ला झाल्याने याप्रकरणात त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. मयूर लोढा व अतुल पाटील यांनी युक्तीवाद केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.