आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या; घटना CCTV मध्ये कैद

आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील झाली.

    कल्याण : आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील झाली. मात्र पोलिसांनी हल्ला परतवून लावत आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. फिरोज खान असे अटक आरोपीचे नाव आहे. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

    मुंबईतील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी गंडा घातला होता. ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती. डीएननगर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला होता. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने सापळा रचला होता.

    यावेळी या वस्तीत आधी एक महिला पोलीस बुरखा घालून आली. तिच्यासोबत इतर काही पोलीस देखील होते. त्यानंतर फिरोज याचा शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. त्यावेळी या पोलिसांनी वस्ती बाहेर थांबलेल्या पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांची पोलीस जीप न घेता शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा वापर केला. या कारवाई दरम्यान आरोपीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत आरोपीला पळून जाण्याची संधी न देता त्याला इराणी वस्तीतून घेऊन गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत.