आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ‘त्या’ सराफावर वार; पोलिसांकडून एकाला अटक

लष्कर परिसरात झालेल्या त्या सराफावरील हल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून, एकाला अटक देखील केली आहे. आईचा अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने हल्ला केल्याचे समोर आले आहे.

    पुणे : लष्कर परिसरात झालेल्या त्या सराफावरील हल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून, एकाला अटक देखील केली आहे. आईचा अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.

    युवराज अनिल गोरखे (वय २४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साथीदार सार्थक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता (वय ३८, रा. कुमार कॅसल सोसायटी, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (३९) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखे याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहतांकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता. शनिवारी (२ डिसेंबर) रात्री सव्वा नऊच्या सुमारास विजय यांना आरोपींनी लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात अडवले.

    गोरखे आणि साथीदाराने त्यांच्यावर कोयता उगारला. विजय घाबरून पळाले. तेव्हा आरोपींनी पाठलाग करुन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर चांगलीच घबराट उडाली होती. पसार झालेल्या गोरखे याला पोलिसांनी अटक केली. आईचा अपमान केल्याने त्याने विजय यांच्यावर हल्ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक प्रियंका शेळके तपास करत आहेत.