इचलकरंजीच्या अट्टल वाहनचोराला अटक; तब्बल १७ वाहने पोलिसांकडून जप्त

पोलिसांनी इचलकरंजी येथील झोपडपट्टी मधून अट्टल वाहन चोर नागेश हनुमंत शिंदे (वय २६ रा. कोरोची ता. इचलकरंजी जि. कोल्हापूर) याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून दुचाकी व चारचाकी मिळून १७ वाहने जप्त केली आहेत.

    सातारा : सातारा शहरांमध्ये वारंवार होणार्‍या दुचाकी चोरीचे रहस्य सातारा शहर पोलिसांनी उलगडले आहे. पोलिसांनी इचलकरंजी येथील झोपडपट्टी मधून अट्टल वाहन चोर नागेश हनुमंत शिंदे (वय २६ रा. कोरोची ता. इचलकरंजी जि. कोल्हापूर) याला शिताफीने अटक करून त्याच्याकडून दुचाकी व चारचाकी मिळून १७ वाहने जप्त केली आहेत. यापैकी १६ वाहने आरोपीने सातारा शहरातून चोरली असून, एक वाहन त्याने रहिमतपूर येथून चोरले होते.

    सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. माने यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. पोलीस मुख्यालयाच्या आरसीपी हॉल येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत या कारवाईची माहिती देण्यात आली.

    सातारा शहरांमध्ये गेल्या काही महिन्यापासून वारंवार वाहन चोरीचे गुन्हे घडत होते. या घटनांची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहर पोलिसांना याबाबतचे कठोर कारवाईचे निर्देश दिले. महेंद्र जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एस माने यांनी दोन स्वतंत्र पथके तैनात करून याबाबतच्या तपासणीला सुरुवात केली.

    सुरुवातीच्या तपासात आरोपी अजिबात हाताला लागत नव्हता. रात्री रेल्वेने इचलकरंजीवरून सातार्‍यात येऊन विशिष्ट ठिकाणी मुक्काम करायचा आणि तेथून रात्री वाहन चोरी करून त्याच्यावरूनच पसार व्हायचे, ही त्याच्या गुन्ह्याची पद्धत होती. मोबाईल अजिबातच वापरत नसल्याने पोलिसांना कारवाईची अडचण झाली होती.

    एका ठिकाणी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी अट्टल वाहन चोर नागेश शिंदे याची ओळख पटवली आणि त्याचा शोध सुरू केला. मात्र तो सातारा जिल्ह्यात आढळून आला नाही. तो इचलकरंजी येथील लाईन टू नावाच्या झोपडपट्टीत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून जगताप यांना मिळाली. त्यानुसार सातारा शहर पोलिसांनी तेथे धाड मारून शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सातारा शहर परिसरातून सोहळा व रहिमतपूर येथून एक अशी १७ वाहने चोरल्याचे कबूल केले.