
दौंड तालुक्यातील राहू येथील टाटा इंडिकेश बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. यामुळे या एटीएमधील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
यवत : दौंड तालुक्यातील राहू येथील टाटा इंडिकेश बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. यामुळे या एटीएमधील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
यवत पोलीस ठाणे अंतर्गत राहू येथील शिवाजी चौकात टाटा इंडिकेश बँकेचे एटीएम मशीन आहे. १ ऑगष्ट रोजी पहाटे तीन नंतर या एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याने हे एटीएम मशीन चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. यामुळे या एटीएममधील दोन लाख २८ हजार रुपये सुरक्षित असल्याचे एटीएम सूत्राने सांगितले.
-सीसीटीव्हीवर मारला काळ्या रंगाचा स्प्रे
एटीएम फोडण्यापूर्वी चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा कलरचा स्प्रे मारला. त्यानंतर एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. विविध हत्यारे वापरूनही एटीएम मशीन त्यांना फोडता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला आहे.
-एटीएमला सुरक्षारक्षक नव्हता
यापूर्वीही सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम मशीन फोडण्याचे प्रकार घडून लाखो रुपये चोरीस जाण्याचे प्रकार पोलीस ठाणे हद्दीत घडले आहेत. चोरटे सुरक्षा रक्षक नसलेले एटीएम हेरून ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे पुढे आले आहे.
-पोलीस निरीक्षकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी हद्दीत असलेल्या सर्व बँक अधिकारी आणि एटीएम चालक यांची बैठक घेऊन प्रत्येक बँक आणि एटीएमच्या ठिकाणी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक त्वरित नेमण्याचे आदेश दिले होते. यानंतरही काहींनी दखल घेतली नसल्याचे राहू येथील एटीएम फोडण्याच्या प्रयत्नावरून समोर आले आहे.