ट्रु कॉलरवर नाव व फोटो वापरायचे अन् पैसे उकळण्याचा प्रयत्न करायचे; पोलिसांत तक्रार येताच…

ट्रु कॉलरवर नाव व फोटो वापरून सदाशिव पेठेतील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मालकाच्या मुलाच्या नावाने अनेक व्यावसायिक व त्यांच्या मित्रांना फोन करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून हा प्रकार सुरु होता.

    पुणे : ट्रु कॉलरवर नाव व फोटो वापरून सदाशिव पेठेतील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मालकाच्या मुलाच्या नावाने अनेक व्यावसायिक व त्यांच्या मित्रांना फोन करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु, सुदैवाने यात फसवणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

    याप्रकरणी ७० वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार १४ ते २६ मार्चपर्यंत सुरू होता.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्रसिद्ध सराफ व्यावसायिक असून, त्यांचे सदाशिव पेठेत ज्वलर्स दुकान आहे. यादरम्यान त्यांच्या मुलाचे नाव आणि फोटो वापरून ट्रु कॉलरवरून तक्रारदार यांचे मित्र व ओळखीतील व्यक्तींना फोन केले. तक्रारदार यांचा मुलगा बोलत असल्याचे सांगत विश्वास संपादन करून पैशांची मागणी केली. मात्र, सुदैवाने यात पैसे दिले गेले नाहीत.

    प्रकार लक्षात आल्यावर लगेच तक्रार

    तोतया आरोपी संबंधितांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्नात होता. परंतु, तक्रारदार यांना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.