उद्धव ठाकरेंच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री भडकले

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावरुन टीका केली आहे.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू इथे मोदींचं आगमन झालं. मोदींच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पार पडले. देहूत त्यांनी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या वारकऱ्यांना संबोधित केले.

    दरम्यान यानंतर ते मुंबईतील राजभवनातील कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात वादाची ठिणगी पडली आहे. देहूमधील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादीकडून आता टीका करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

    मोदींच्या कार्यक्रमावरून हा वाद होत असतानाच, आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागतसाठी आयएनएस शिक्रा येथे गेले होते. स्वागत करून निघताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्र निघाले. मात्र यावेळी सोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून आदित्य ठाकरे यांना उतरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात येत आहे. यावरुन मुख्यमंत्री देखील संतापले असे वृत्त आहे. मुंबईच्या माजी महापौर व शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावरुन टीका केली आहे.