काजूकतली फुकटात न दिल्याने दुकानदारावर गोळी झाडण्याचा प्रयत्न; सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपींना ८ तासात बेड्या

काजूकतली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यावरून दोघांनी दुकानदारावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरात घडली. माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने ८ तासात या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    पुणे : काजूकतली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्यावरून दोघांनी दुकानदारावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरात घडली. सुदैवाने फायर न झाल्याने दुकानदाराचा जीव वाचला गेला असून, या तरुणांना दोन वेळा फायर केला परंतु, तो होऊ शकला नाही. भरदुपारी झालेल्या या घटनेने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र, व्यावसायिक भितीपोटी पोलिसांकडे गेलाच नव्हता. माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने ८ तासात या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    या प्रकरणी पोलिसांनी सुरज ब्रह्मदेव मुंडे (वय २३, रा. माणिकबाग) याला अटक केली आहे. तर, १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जोधाराम चौधरी (वय ५०) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, गणेश झगडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    सिंहगड रोड परिसरातील गोयल गंगा खाऊ गल्लीत फुलपरी स्वीट मॉल आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास दोघेजन काजूकतली घेण्यासाठी दुकानात आले. त्यांनी एक किलो काजूकतली फुकट मागितली व पैसेही मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे व्यावसायिकांनी त्यांना काजूकतली देण्यास नकार दिला. त्यावेळी सुरज याने पिस्तूल काढून त्यांच्यावर रोखले. तसेच, चार वेळा ट्रिगर दाबला. पण, लोडेड पिस्तूलातून गोळी झाडली गेली नाही. त्यानंतर हे दोघे दुकानाच्या बाहेर आले. लॉक झालेली पिस्तूलाचे लॉक काढले व परत आत शिरले. त्यांनी पुन्हा गोळी झाडली मात्र, तरीही गोळी झाडली गेली नाही. भरदुपारी झालेल्या याप्रकाराने व्यावसायिक गोंधळून गेला. भितीपोटी तो बाहेर देखील पडला नाही. पण, आरोपी तेथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी व्यावसायिक पोलिसांकडे गेला. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.