शनिवारवाड्याजवळ एटीएम उचकटून रोकड चोरीचा प्रयत्न; उत्तर प्रदेशातील चोरट्यांची टोळी गजाआड

शनिवारवाडा भागातील खासगी बँकेचे एटीएम उचकटून रोकड चोरीचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला पोलिसांनी अटक केली.

    पुणे : शनिवारवाडा भागातील खासगी बँकेचे एटीएम उचकटून रोकड चोरीचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीला पोलिसांनी अटक केली. आशिष हरिकेश विश्वकर्मा (वय ३०), नायब लालचंद पटेल (वय २८), मनीष मुन्ना पांडे (वय ३१), कमल राजकुमार विश्वकर्मा (वय २२, सर्व रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत मनैय्या टणकेदार (वय २३, रा. रामलेक्स काॅलनी, शिवणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, टणकेदार एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहे. कंपनीकडून एटीएमची सुरक्षाव्यवस्था सांभाळली जाते. शनिवारवाड्याजवळ कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम आहे, तसेच अप्पा बळवंत चौकात बँकेचे आणखी एक एटीएम केंद्र आहे. चोरट्यांनी शनिवारवाडा आणि अप्पा बळवंत चौक परिसरातील एटीएममध्ये शिरुन तोडफोड केली. एटीएममधून रोकड चोरीचा प्रयत्न केला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तपास करुन चोरट्यांना पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत.