पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनाचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा दाखल

कार घेऊन मटन आणण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर पाच जणांनी किरकोळ कारणावरून हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली आहे. कार बाजूला न घेतल्यावरून हा हल्ला झाला आहे.

    पुणे : कार घेऊन मटन आणण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर पाच जणांनी किरकोळ कारणावरून हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लोहगाव परिसरात घडली आहे. कार बाजूला न घेतल्यावरून हा हल्ला झाला आहे. पोलीस नाईक पी. आर. मोटे असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात कालीदास खांदवे (वय ३५), माऊली खांदवे व इतर तीन अशा पाच जणांवर खूनाचा प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. ते पोलिस नाईक आहेत. ते रविवारी सकाळी लोहगाव येथील जगदगुरू पेट्रोल पंपाजवळील प्रतिक मटण शॉपमध्ये कारमधून मटण आण्यासाठी गेले होते. त्यांनी येथे कार पार्क केली. यावेळी कालीदास खांदवे याने त्यांना कार बाजूला घेण्यास सांगितले. त्यांनी मी पोलीस असून, थोड थांबा असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.

    कालीदास व माऊलीने त्यांची दुचाकी कारला आडवी लावली व त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांना मारण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांच्या इतर ३ साथीदारांनाही येथे बोलावून घेतले. त्यानंतर या पाच जणांनी त्यांच्यावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केला. त्यांच्या डोक्यात सिमेंटचे ब्लॉक मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये मोटे हे गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.