माजी सभापतीच्या मुलावर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न; पुरंदरमधील ऑस्करवाडी येथे घडली घटना

पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांच्या मुलावर रक्तातील नात्यानेच कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    सासवड : पुरंदर तालुक्यात जमिनीचे दर गगनाला भिडल्याने बोगस खरेदीखत करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहेत. जमिनीमुळे नातेसंबंध मोठ्या प्रमाणात बिघडले असून रक्ताची नाती एकमेकांचा जीव घेण्यास मागेपुढे बघत नाहीत. आतापर्यंत कोर्ट कचेरी आणि शिवीगाळ करणाऱ्या हातात आता कोयते, कुऱ्हाडी आल्या असून दिवसा ढवळ्या एकमेकांवर उगारले जात आहेत. अशाच एका घटनेमध्ये पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांच्या मुलावर रक्तातील नात्यानेच कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

    पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब घाटे यांचा मुलगा अजय दादासाहेब घाटे यांच्यावर सख्खा चुलता आणि त्याच्या मुलाने कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून डोक्यात कोयत्याने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत मंगल दादासाहेब घाटे, (वय ५०. रा. चिदानंद सोसायटी, गोकुळ नगर, कोंढवा रोड, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रायबा धोंडीबा घाटे, (वय ५१ आणि संकेत रायबा घाटे, वय २५. दोघेही रा. पठारवाडी, ता. पुरंदर) यांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल घाटे आणि त्यांचा मुलगा अजय घाटे हे दि. २३ रोजी पुरंदर तालुक्यातील भिवरी जवळील ऑस्करवाडी येथील काळूबाई मंदिरात देवदर्शनासाठी आले होते. देवाची आरती झाल्यानंतर मंदिराचे पुजारी यांच्या अंगात देवाचा संचार होत असल्याने ते पाहण्यासाठी दोघेही इतर ग्रामस्थासमवेत मंदिरात थांबले होते.

    दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांच्याच कुटुंबातील असलेले चुलते रायबा धोंडीबा घाटे आणि त्यांचा मुलगा संकेत रायबा घाटे हे दोघे मंदिरात आले. त्यावेळी त्यांच्याकडे दोन पिशव्या होत्या, त्यातील कोयते दोघांनी बाहेर काढले. त्यानंतर आरोपी रायबा घाटे याने जखमी अजय घाटे यास पाठीमागून पकडून ठेवले तर चुलतभाऊ संकेत घाटे याने हातातील कोयत्याने अजय घाटे याच्या डोक्यात जोरदार वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

    अचानक घडलेल्या प्रसंगामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. घटनेनंतर लगेचच सासवड पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. जखमी अजय घाटे यास एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघाही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोयता जप्त केला असून एक कोयता अद्याप जप्त करायचा आहे. दोघांनाही सासवड न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे पुढील तपास करीत आहेत.