मला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न; शशिकांत शिंदे यांचा गंभीर आराेप

तीन-तीन वेळा चौकशी झालेल्या त्याच त्या खोट्या गुन्ह्यात पुन्हा पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता, असा गंभीर आरोप इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

  कराड : मला जबरदस्ती तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. त्याचा उद्देश एकच होता की मी लोकसभेला बाहेर राहू नये. त्यासाठी तीन-तीन वेळा चौकशी झालेल्या त्याच त्या खोट्या गुन्ह्यात पुन्हा पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न सुरू होता, असा गंभीर आरोप इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

  शशिकांत शिंदे म्हणाले, त्या केसमध्ये तथ्य नाही. खोट्या केसमध्ये खोटी कलम लावून अजामीनपात्र करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. तो जुना आहे. सिद्ध झाला तर जनतेच्या दरबारात फाशी जाईन. मला न्यायालयावर आणि जनतेवर विश्वास आहे. पूर्वीच्या या गुन्ह्याची तीन तीन वेळा चौकशी होऊन सुद्धा पुन्हा मला त्यामध्येच अडकून तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. हे सगळं कोण काय करतंय, सर्व समजतंय, पण ते आत्ता बोलायची वेळ नाही. असं शिंदे म्हणाले.

  कराड तालुक्यात काँग्रेसचा एक मेळावा, शिवसेनेचा एक मेळावा, रयत संघटनेचा तिसरा मेळावा असे वेगवेगळे मेळावे का घेतले जात आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार शिंदे म्हणाले, महाविकास आघाडी एकसंघच आहे, पाठींबा देण्यासाठी व माझा कार्यकर्त्यांशी थेट परिचय व्हावा, या उद्देशाने वेगवेगळे मेळावे घेतले जात आहेत, असे आमदार शिंदे यांनी सांगितले.

  शरद पवार एकीकडे यशवंत विचार म्हणतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देतात, या उदयनराजे यांच्या आरोपाबाबत पत्रकारांनी विचारले असता आमदार शिंदे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षानेच उदयनराजे यांना यापूर्वी उमेदवारी देऊन खासदार केले होते. पण लोकांना ज्या पक्षाची धोरणे आवडत नाहीत, त्या पक्षात उदयनराजे आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

  आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन

  आमदार शिंदे म्हणाले, भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं झालं तर आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन. असे मी पाठीमागेही जाहीरपणे सांगितले आहे. आणि उदयनराजे हे छत्रपती आहेत. मी सर्वसामान्य जनतेमधील कार्यकर्ता आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? मी फक्त जनतेत जाऊन एवढेच सांगतोय की ‘यशवंत विचार’ जोपासण्यासाठी मी उभा आहे आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हा विचार टिकवा. एवढेच जनतेला हात जोडून आवाहन करतोय.

  नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी समर्थन केले हाेते

  गुन्हा खोटा होता म्हणता तर जामीन का घेतला, अशी टीका माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी तुमच्यावर केली होती, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार शिंदे म्हणाले, त्याच नरेंद्र पाटील यांनी हा गुन्हा खोटा आहे, असे म्हणत पूर्वी माझे समर्थन केले होते. पण आता ‘असेच’ बोला असे कोणीतरी त्यांना सांगितले असेल. आणि निवडणूक हातातून निसटून जाऊ लागली की अशा टीका आणि आरोप होत असतात, हे मला नवीन नाही. मी ग्राउंड लेव्हलला काम करणारा प्रचारक कार्यकर्ता आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.