भाडोत्री गुंडांकडून ऊसदर आंदोलने मोडीत काढण्याचा प्रयत्न ; बळीराजाचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांचा आरोप

सवता सुभा मांडलेल्या शेतकरी संघटना आणि त्यांची वेगवेगळी आंदोलने यांचा गैरफायदा घेत कारखानदार आपल्या भाडोत्री गुंडांकडून आंदोलने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी पत्रकार बैठकीत केला. ऊस दराची कोंडी न फुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालू, असा इशाराही देण्यात आला आहे.

  इस्लामपूर : सवता सुभा मांडलेल्या शेतकरी संघटना आणि त्यांची वेगवेगळी आंदोलने यांचा गैरफायदा घेत कारखानदार आपल्या भाडोत्री गुंडांकडून आंदोलने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी पत्रकार बैठकीत केला. ऊस दराची कोंडी न फुटल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालू, असा इशाराही देण्यात आला आहे.

  शेवाळे म्हणाले, ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका होतात, मात्र सांगली जिल्ह्यात पालकमंत्री सुरेश खाडे कारखानदारांच्या निरोपाची वाट बघत बसले आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक सलगर, वाळवा तालुका उपाध्यक्ष महादेव कारंडे, बळीराजा कामगार संघटनेचे विनोद शेवाळे, संतोष चौधरी, शिवाजी माने, शहाजी माने, दत्तात्रय देसाई, मदन पाटील उपस्थित होते.

  आंदोलनादरम्यान किल्लेमच्छिंद्रगड व बहे बोरगाव रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या टायरातील हवा सोडत असताना कृष्णा कारखाना आणि राजारामबापू कारखान्याच्या भाडोत्री गुंडांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचा बंदोबस्त करा यामागणीसाठी जिल्हापोलीस प्रमुखांना निवेदन देणार आहोत, असे शेवाळे यांनी सांंगितले.

  सदाभाऊ खोत यांच्याकडून िदशाभूल
  ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी ठामपणे कोणतीही संघटना पुढे येत नाही. यामुळे आंदोलने दिशाहीन झाली आहेत. परिणामी ऊसाला भाववाढ मिळालेली नाही. ऊस आंदोलन सुरू असतानाच दिशाभूल करण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत दूध आंदोलनात आहेत. शेतकरी नेते आपापल्या सोयीप्रमाणे ऊस दाराची मागणी करत आहेत, असे शेवाळे म्हणाले.

  ऊस दाराची कोंडी फोडण्यासाठी प्रसंगी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, चेअरमन,आमदार, खासदार यांना रस्त्यावर फिरकू देणार नाही.

  -गणेश शेवाळे, राज्य युवा अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना