आरक्षण न देणाऱ्यांचा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा आरोप

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

    मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

    अनेक वेळा मुख्यमंत्रिपदावर राहूनही आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहूनही जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये फूट पाडत आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण आणि राज्यभरात पेटलेले आंदोलन या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी हे ट्विट केले आहे.

    त्यामध्ये नारायण राणे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा तरुणांनी आत्महत्या करू नयेत. हिंसेच्या मार्गाला जाऊ नये. मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सर्वांनाच वाटते. मात्र, अनेक वेळा मुख्यमंत्रिपदावर राहूनही आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहूनही जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये फूट पाडत आहेत. राज्याचे वातावरण बिघडवित आहेत. यासंबंधीची दखल तपास यंत्राणा घेतील, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.