पुणे शिक्षण उपसंचालकाची अँटीकरप्शनला हजेरी! शालार्थ आयडीसाठी बार्शीच्या शिक्षकाने लाच मागितल्याचे प्रकरण

पुणे विभागाचे तत्कालीन शिक्षण उप संचालकाची ओळख असल्याचे सांगून शालार्थ आयडी मिळवून देतो म्हणून शिक्षकांना लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बार्शीच्या शिक्षकाविरुद्धच्या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याच्या उप संचालकांना बुधवारी सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला हजेरी लावावी लागली.

    सोलापूर: पुणे विभागाचे तत्कालीन शिक्षण उप संचालकाची ओळख असल्याचे सांगून शालार्थ आयडी मिळवून देतो म्हणून शिक्षकांना लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बार्शीच्या शिक्षकाविरुद्धच्या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याच्या उप संचालकांना बुधवारी सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला हजेरी लावावी लागली.

    पुणे विभागाचे तत्कालीन उपसंचालक उकिरडे यांची ओळख असल्याचे सांगून शालार्थ आयडीसाठी शिक्षक सचिन उकिरडे याने शिक्षकांना लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक काय कार्यालयाने शिक्षक उकिरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी सुरू केली आहे. याकामी माहिती घेण्यासाठी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना बुधवारी सोलापूर येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक उकिरडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाला हजेरी लावली व तपासाच्या अनुषंगाने त्यांच्याकडून माहिती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्या समवेत प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिकचे महारुद्र नाळे उपस्थित होते. शिक्षण उपसंचालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने सोलापुरातील शिक्षण विभागात हा चर्चेचा विषय झाला आहे.

    ढेपे यांची चौकशी कधी?

    प्राथमिक शिक्षण विभाग वेतन पथकाचे अधीक्षक विठ्ठल ढेपे यांच्यावरही शिक्षक भारती संघटनेने आरोप केला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी चौकशी समिती लावली आहे. याशिवाय शिक्षण आयुक्त मांढरे यांनी त्यांच्यावर ठपका ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप या प्रकरणांची चौकशी सुरू झालेली नाही, अशी शिक्षकांमध्ये चर्चा आहे.