cctv

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांसोबतच आता सीसीटीव्ही कॅमेरेही 'ड्युटी' करत आहेत. शहरातील 17 विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटी कार्यालयाच्या वतीने 122 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.

    संभाजीनगर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक पोलिसांसोबतच आता सीसीटीव्ही कॅमेरेही ‘ड्युटी’ करत आहेत. शहरातील 17 विविध चौकांमध्ये वाहतूक पोलीस आणि स्मार्ट सिटी कार्यालयाच्या वतीने 122 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे कॅमेरे नियम मोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक टिपून वाहनमालकाच्या मोबाईल क्रमांकावर दंडाची पावती पाठवित आहेत.

    शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केंब्रिज नाका, सिडको बसस्थानक चौक, बाबा पेट्रोलपंप ते नगरनाका या रस्त्यावर, हसूल टी पॉइंट ते सिडको बसस्थानक चौक, सेव्हन हिल्स ते दर्गा चौक या प्रमुख मार्गावरील चौकांमध्ये हे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कॅमेरे ई-चालान प्रणालीशी जोडण्यात आले आहेत. सिग्नल जम्प करणे, स्टॉप लाईन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, राँग साइड वाहन चालविणे, ट्रिपल सीट, हेल्मेट न वापरणे आदी विविध नियम मोडणाऱ्या वाहनांचा हे कॅमेरे ऑटोमॅटिक फोटो काढतील व काही मिनिटातच संबंधित वाहनमालकाला त्याची माहिती मिळेल.

    नियमांचं उल्लंघन करू नका

    या यंत्रणेमुळे अपघात करून पळून जाणारे वाहनचालक, तसेच मंगळसूत्र, मोबाईल हिसकावणारे, रोड रॉबरी करणारे आदींचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे. ही यंत्रणा नागरिकांच्या सोयीसाठी आहे. वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी केले आहे.