संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ट्रॅव्हल्सकडे वाहतूक पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे.

  पिंपरी : रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ट्रॅव्हल्सकडे वाहतूक पोलिसांनी मोर्चा वळविला आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल तर थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच ट्रॅव्हल्स बसवाल्यासांठी शहरात पाच पिकअप पॉईंट निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त शहरात प्रवाशांच्या ‘पिकअप’ आणि ड्रॉपसाठी कुठेही बस थांबवून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

  पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे ही आयटी पार्कक्षेत्रे आहेत. तसेच देहू व आळंदी ही संतांची भुमी आहे. शहरात पिंपरी बाजारपेठ सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्या अनुषंगाने राज्यातील तसेच देशातील नागरिक उदरनिर्वाहाकरीता पिंपरी -चिंचवड आयुक्तालय हद्दीत स्थायिक झाल्याने शहराचा विकास तसेच वाढ वेगाने होत आहे. नागरिक आपल्या गावी ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने लक्झरी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय निवडतात. लक्झरी ट्रॅव्हल्स बस या निगडी, तळवडे, भोसरी हद्दीतून महाराष्ट्रात तसेच देशातील विविध राज्यात येतात व जातात.

  पिंपरी – चिंचचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील निगडी, तळवडे व भोसरी येथून लक्झरी ट्रॅव्हल्स बस ये-जा करत असताना यामार्गातील मधुकर पवळे उड्डाणपूल, खंडोबा माळ, चिंचवड, बिजली नगर, चिंतामणी चौक, अहिंसा चौक, चापेकर चौक, थेरगाव, बिर्लाहॉस्पिटल, डांगे चौक, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी तसेच इतर कोणत्याही ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच अपघातांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी ट्रॅव्हल्स बस वर कारवाईचे आदेश दिले आहेत.

  ‘हे’ आहेत ‘पिकअप पॉईंट’

  निगडी येथील भक्‍ती शक्‍ती सर्कल तसेच तळवडे येथील टॉवर लाईन व रुपीनगर तसेच भोसरी येथील गावजत्रा मैदान व लांडेवाडी येथील बाबर पेट्रोल पंप हे लक्झरी ट्रॅव्हल्स बससाठी पिक अप व ड्रॉप पॉईंट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेकडून निश्चित केले आहेत. त्या व्यतिरिक्त लक्झरी ट्रॅव्हल्स बस कुठेही थांबल्यास बसवर संबंधित वाहतूक विभागांकडून कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणारआहे. दरम्यान, नागरिकांनीही गैरसोय टाळण्यासाठी ठरवून दिलेल्या पॉइंटवरुनच प्रवास सुरू करावा, असे आवाहन पिंपरी -चिचवड वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

  लक्झरी ट्रॅव्हल्स बससाठी मूळ ठिकाणाहून निघाल्यानंतर पिंपरी - चिंचचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवासी घेण्यास मनाई केली आहे. ट्रॅव्हल्स बससाठी पिकअप व ड्रॉप पॉईंट निश्चित केले आहेत. त्यानुसार बसचालक व नागरिकांनी सहकार्य करावे.

  - बापू बांगर, पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड)