पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांची चौकशी करण्याची अतुल भातखळकरांची मागणी

केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी बैठका घेत होते. त्यामुळे या प्रकरणी त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

    मुंबई : ईडीने (ED) चार दिवसांपूर्वी पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. आता या आरोपपत्रातून नव नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आता दिवसेंदिवस वाढत आहे. आता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या (Sharad Pawar)  उपस्थितीत संजय राऊतांनी बैठका घेतल्याचा दावा भाजप नेते अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

     

    ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत (Sanjay Raut) हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. 1039 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचे म्हणत यात राऊतांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मात्र आता भाजपने या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेच. पत्राचाळ प्रकरणी त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहीले आहे. केंद्रात कृषी मंत्री असताना शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी बैठका घेत होते. त्यामुळे या प्रकरणी त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.