तीन खुनांच्या घटनांनी औरंगाबाद हादरले; तरुणीची एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन हत्या

दुसऱ्या घटनेत जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी साबिर शहा कासीम शहा (वय ३६) व फरहान खान निजाम खान (वय १९, दोघेही रा. कटकटगेट पाण्याच्या टाकीजवळ) या दोघांमध्ये किरकोळ शिवीगाळ करण्याच्या कारणावरून वाद झाला.

    औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वीच शहरात एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना शनिवारी (२१ मे) भरदुपारी एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयापासून जवळच खून करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मृत १९ वर्षीय विद्यार्थिनी व तिचा मारेकरी हे दोघेही एकाच समुदायातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    दुसऱ्या घटनेत जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी साबिर शहा कासीम शहा (वय ३६) व फरहान खान निजाम खान (वय १९, दोघेही रा. कटकटगेट पाण्याच्या टाकीजवळ) या दोघांमध्ये किरकोळ शिवीगाळ करण्याच्या कारणावरून वाद झाला. फरहानने जवळील एका धारदार वस्तूने साबीरशहा यांच्या पोटात मारुन गंभीर जखमी केले. साबीरशहा याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी पहाटे त्याला मृत घोषित केले.

    औरंगाबाद शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आता दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. जखमी शेख नासिर शेख बशीर (वय ३८) याचा शनिवारी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्यातील आरोपी फय्याज राजू पठाण याला १५ मे रोजीच अटक केली होती. शुक्रवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, असे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.